लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर: ‘मला साईड का दिली नाही?’ या कारणावरून एसटीचालकाला मारहाण करून, महिला कंडक्टरला कारच्या बोनेटवरून शंभर फुटांपर्यंत फरफटत नेल्याची घटना राजगुरुनगर येथे पुणे-नाशिक महामार्गावर तुकाई-भांबुरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बसचालक सदू किसन भालेराव (वय ४३, रा. जउळके बु., ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला असून, त्याचे नाव समजू शकले नाही. राजगुरुनगर आगाराची एसटी बस मंचर येथे प्रवासी घेऊन जात होती. तुकाईभांबुरवाडी गावाजवळ पुणे -नाशिक महामार्गावर एसटी बसला मागून एका कारने (एमएच १४ जीवाय ९१८२) ओव्हरटेक करत कार एसटी बसला आडवी घालत थांबवली. याने कार एसटी बसला आडवी लावली. कारचालकाने कारच्या डिकीमधून लाकडी काठी काढून बसची समोरील काच फोडली. तसेच चालकाला मारहाण केली. दरम्यान, एसटी बसमधील महिला कंडक्टर सारिका चिंचपुरे यांनी कार चालकास ‘तुम्ही असे करू नका, आम्ही ऑनड्यूटी आहोत. थोडं थांबा चालकाला मारहाण करू नका,’ असे सांगितले असता कारचालकाने ‘मला साईड का दिली नाही, मला एक मर्डर करण्याचा अधिकार आहे. मी तुमच्या दोघांकडे बघून घेतो मी कोण आहे हे तुम्हाला दाखवितो’, असे म्हणून निघून जाऊ लागला. दरम्यान, चिंचपुरे यांनी एसटीचे आधिकारी येईपर्यंत कारचालकास थांबण्याची विनंती केली. परंतु, तो न थांबता निघून जावू लागला. यामुळे चिंचपुरे यांनी कारचा समोरील एक वायफर धरला असता. मात्र, कारचालकाने कार सुरू करून पुढे दामटली. यावेळी चिंचपुरे या कारच्या बोनेटवर वायफरला धरून बसल्या. मात्र, तरीही कारचालकाने कार थांबविली नाही व चिंचपुरे यांना जवळपास शंभर फुटांपर्यंत फरफटत नेले. दरम्यान, रस्त्याने जाणारे दुसऱ्या गाडी वरील लोक हे मोठमोठ्याने ओरडल्याने कारचालकाने कार थांबविली. वाहक चिंचपुरे खाली उतरल्यानंतर तो तिथून पुढे मंचर बाजूकडे निघून गेला. या चालकाविरुद्ध सरकारीकामात अडथळा निर्माण करून मारहाण शिवीगाळ, दमदाटी करून एसटी बसची तोडफोड केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरारी कारचालकाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षाराणी घाटे करीत आहे.