नसरापूर : पुणे सातारा महामार्गवरील कापूरव्होळ(ता. भोर) उड्डाण पुलावरील खड्डे चुकविताना झालेल्या अपघातात वसीम इब्राहीम सय्यद (वय ४२ मुजावर कालनी, कराड, जि. सातारा) या चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात गाडीतील चार जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना नसरापूर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काल (दि.२७ रोजी) दुपारी पावणे तीन च्या दरम्यान ही घटना घडली.
या प्रकरणी या गाडीतील सहप्रवासी फिर्यादी जावेद आदीलशहा इनामदार (वय ३६ वर्षे, रा.न-हे आंबेगाव, पूणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हुजेफा वसीम सय्यद (वय १५ रा. मुजावर कॉलनी , कराड, जि. सातारा) जावेद आदिलशाह इनामदार (वय ३६,) शैरोनिसा जावेद इनामदार (दोघेही रा. नन्हे आंबेगाव) शाहरुख शरीफ मुजावर वय ३० ( रा. हिरवडे, ता. करवीर,कोल्हापूर) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळी अपघाताचे वेळेस तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनूसार पुणे बाजूकडून सातारा बाजूकडे जाणाऱ्या (एम एच १४ बी एक्स ४७६४) वाहनाने पुणे सातारा महामार्गवरील कापूरव्होळ (ता. भोर) येथील उड्डाण पुलावरील खड्डे चुकविताना या गाडीने तीन पलट्या घेतल्या. त्यात गाडीचे नुकसान झाले. मात्र यातील चालक वसीम इब्राहीम सय्यद यास गंभीर दुखापत होऊन बेशुध्द होता. त्यावेळी जमलेल्या नागरिकांनी व पोलिसांनी या गाडीतील प्रवाशांना बाहेर काढले. मात्र यातील चालकाचा मुलगा हुजेफा मात्र मरणासन्न व बेशुध्द अवस्थेतील वडिलांचा जीव वाचावा याकरीता त्याने रस्त्यावरच देवाकडे प्रार्थना करत होता. आणि गंभीर जखमी वडीलांच्या कानाला फोन लावून पप्पा उठो ना, मम्मी से बात करो, असे वारंवार सांगत राहिला होता. हा करुण प्रसंग पाहून मदतीसाठी धाऊन आलेल्यांना गहिवरून आले होते. याप्रकरणी जावेद इनामदार यांनी चालक वसीम इब्राहीम सय्यद याचे विरुद्ध गाडी वेगात चालवून गाडीचा ब्रेक दाबून अपघात केल्या बाबत राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.