पुणे : अचानक फिट आल्यामुळे चालक (ड्रायव्हर) खाली पडला. त्याचे डोळे पांढरे झाले, हात-पाय वाकडे झाले. हे पाहून बसमधील सर्वच महिला घाबरल्या. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे कुणाला काही सुचेनासे झाले, अशा परिस्थितीत योगिता धर्मेंद्र सातव यांनी बसचे स्टिअरिंग स्वतःच्या हातात घेऊन ड्रायव्हरला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी, तर सर्व सहकारी महिलांना सुखरूप घरी पोहोचवले.
वाघोली येथील २२ - २३ महिलांचा ग्रुप शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे फिरायला गेला असताना हा प्रकार घडला. अचानक उद्भवलेल्या प्रसंगाचा धीराने सामना करत योगिता सातव यांनी परिस्थिती हाताळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोराची चिंचोली येथून परतत असताना हा प्रकार घडला. योगिता सातव यांनी स्वतः गाडी चालवत वाटेवरील पुढील गावापर्यंत गाडी चालवत आणली. तेथे ड्रायव्हरवर उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसरा चालक बोलावून सर्व महिलांना वाघोलीपर्यंत ४० किलोमीटर सुखरूप पोहोचवण्यात आले.
वाघोली गावच्या माजी सरपंच जयश्री सातव - पाटील यांनी आपल्या सहकारी आणि सहलीच्या आयोजक आशा वाघमारे यांच्यासह योगिता सातव यांचा घरी जाऊन सत्कार करत कौतुक केले. यावेळी जयश्री सातव म्हणाल्या, की चारचाकी वाहने बहुतेक महिला चालवितात; परंतु परिस्थिती गंभीर असताना बस चालवण्याचे वाघोलीतील योगिता सातव यांनी मोठे धाडस दाखवले, तसेच चालकासह सर्व सहकारी महिलांचे प्राण वाचवले.