इंदापूर - पिकअप गाडी पळवून नेताना इतर दुचाकी व चारचाकी वाहनांना धडका देत लोकांना जखमी करण्याचा प्रताप एका दारूड्याने आज (दि.४) दुपारी दीडच्या सुमारास शहरातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाबा चौकात केला. लोकांच्या दुखापतीस व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या या दारूड्याला पोलिसांनी पिकअप गाडीसह ताब्यात घेतल्याने चोरीचा हेतू सफल झाला नाही.उलट त्याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.नवनाथ गणपत बल्लाळ (रा. वरकुटे, ता. इंदापूर) असे या दारूड्याचे नाव आहे. पिकअप गाडीचा मालक महेश अभिमन्यू पडळकर (रा. भावडी, ता. इंदापूर) याने त्याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.फिर्यादी महेश पडळकर दुकानाचा माल भरण्यासाठी ते आपली पीकअप गाडी (एमएच ४२, बी ८८२) घेऊन इंदापूरला आले होते. ही गाडी आरोपीने चोरली. ती घेवून तो भरधाव वेगात निघून जात असताना त्याने नवनाथ मोहन सूर्यवंशी (रा. पिटकेश्वर, ता. इंदापूर) यांच्या दुचाकीला धडकला. त्याच्यासह नवनाथ रघुनाथ शिंदे (रा. आठभाई मळा, इंदापूर), सुधीर साधू अभंग (रा. पिटकेश्वर, ता. इंदापूर) यांना त्याने ठोस देऊन जखमी केले. निवृत्ती जनार्दन थोरात (रा. वडापूरी, ता. इंदापूर), प्रदीपकुमार रसिकलाल सिंघवी (रा. सोलापूर) यांच्या चारचाकी वाहनांना व हेमंत निवृत्ती थोरात (रा. वडापूरी) यांच्या दुचाकीला धडक मारून नुकसान केले.
दारुड्या चालकाचे दे धडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:11 AM