पुणे : कंपनीच्या मालकाने त्याच्या दोन चालकांना वाहनात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी अमेरिकन एक्स्प्रेस प्लॅटीनम कंपनीचे क्रेडिट कार्ड दिले होते. चालकांनी पेट्रोल पंप कामगाराशी संगनमत करून या कार्डचा गैरवापर करत मालकाला २८ लाख ८४ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी तीन जणांविरोधात चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र सुगणचंद भवर (रा. वडगाव शेरी), नितीन गोरख खरात (रा. येरवडा) अशी दोन चालकांची तर माऊली पेट्रोलपंपवरील काम कर्मचारी प्रकाश व त्याचे अन्य साथीदार अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कंपनी मालकाच्या वतीने कपील सुभाष पाटील (४४, रा. बाणेर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, किशोरीलाल रामरायका असे कंपनी मालकाचे नाव आहे. हा प्रकार जानेवारी ते जून या काळात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामरायका यांच्याकडे असलेल्या राजेंद्र भवर आणि नितीन खरात या दोन चालकांनी (ड्रायव्हर) पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने क्रेडिट कार्डचा गैरवापर करत २८ लाख ८४ हजार एवढ्या रकमेचा अपहार केला आहे. अद्याप याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली नसून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चाळके करत आहेत.