पुणे : सध्या चायनिज मांजावर बंदी असतानाही शहरात सर्रास त्याची विक्री होत आहे. हे मांजे मात्र दुचाकीचालकांच्या जीवावर बेतत आहेत. शुक्रवारी दुपारी धायरी येथील उड्डाणपुलावर एका मांज्यामुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेला. वाहनचालकाने गाडीला ब्रेक दाबल्यामुळे तो थोडक्यात बचावला. परंतु, गळ्यावर मात्र चिर पडली. धायरी उड्डाणपुलावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नायलॉनचा मांजा कुठून तरी उडून या पुलावर आला होता. तो पुलावर अडकला होता. वाºयाने तो उडाला आणि दुचाकीस्वाराच्या समोरून गळ्याला अडकला. त्यामुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेला. गाडीचा वेग अधिक असता तर हा मांजा जीवावर बेतला असता. परंतु, थोडक्यात निभावले गेले. खरंतर गेल्या काही वर्षांपासून चायनीज मांज्यावर बंदी आहे. वन विभागाला असे मांजा दिसल्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यावर कोणीही कारवाई करीत नसल्याने सर्रास दुकानांवर हे मांजे विक्रीला आहेत. सध्या मकरसंक्रांत जवळ येत असून, पतंग उडविण्यासाठी मुले मांजे विकत घेत आहेत. त्यात चायनीज मांजा अत्यंत घातक असतो. त्याने गळा काही क्षणात चिरला जातो. तसेच हे मांजे पक्ष्यांच्याही जीवावर बेततात. अनेक पक्षीही आपला जीव या मांज्यामुळे गमावतात. नायलॉन मांज्याचा वापर करून अनेकजण पतंग उडवतात. पतंग उडविताना तो विद्यूत तारेपासून दूरच उडविला पाहिजे. अन्यथा तारेला चिकटून त्यातून विद्यूतप्रवाह उतरण्याचा धोका आहे. पतंग कटल्यानंतर तो इतरत्र उडत जातो. नायलॉन मांज्यामध्ये धातूच्या भुकटीचा वापर केलेला असतो. त्यामुळे धातूमुळे वीज प्रवाहाचा झटका बसण्याची शक्यता असते. तसेच एखाद्या दुचाकीस्वाराच्या समोर आला, तर त्याचा गळा चिरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा नायलॉनचा मांजा जीवावर बेतू शकतो.
मी दुपारी दुचाकीवर शहरात येत होतो. तेव्हा धायरी पुलावर अचानक माझ्यासमोर नायलॉनचा मांजा गळ्यावर आला. तेव्हा मी ब्रेक दाबला. तोपर्यंत मांज्याने माझा गळा चिरलेला होता. लवकर थांबल्याने अधिक इजा झाली नाही. -अजय वसाके, दुचाकीचालक
चायनीज मांजाला कायद्याने पूर्णत: बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही त्यावर काहीच कारवाई होत नाही. आज प्रत्येक दुकानात हा मांजा विकला जातो. तो बंद करून, संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे. कारण या मांज्यामुळे पक्षी आणि नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. - संतोष थोरात, पक्षीप्रेमी आणि वाईल्ड एनिमल्स एन्ड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी