पुणे : वर्दळीच्या स्वामी विवेकानंद रस्त्यावर भल्या सकाळी पीएमपी बस रस्त्याच्या उलट्या बाजूने घुसल्यामुळे समोरुन येणार्या वाहनचालकांची पाचावर धारण बसली. चालता चालता अचानक बस बंद करुन रस्त्यामध्ये तशीच बेवारस सोडून चालक आणि वाहक दोघेही गायब झाल्यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी वारंवार पीएमपी प्रशासनाला कळवूनही दुपारी दीड वाजेपर्यंत ही बस हलविण्यात आलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीची एमएच १४, सीडब्ल्यू १७८२ ही बस स्वामी विवेकानंद रस्त्यावरुन स्वारगेटकडून बिबवेवाडीच्या दिशेने येत होती. बिबवेवाडीकडून स्वारगेटच्या दिशेला जाणार्या मार्गिकेमध्ये घुसली. त्यामुळे समोरुन येत असलेल्या वाहनचालकांना अचानक समोरुन आलेल्या बसमुळे धडकी भरली. विरुद्ध दिशेने बस आल्यामुळे वाहनचालकही गडबडून गेले होते. काही जणांनी घाबरुन आपापली वाहने बाजुला घेतली. दरम्यान, ही बस बंद करुन रस्त्यावर आहे तशा अवस्थेत ही बस ठेवून चालक आणि वाहक निघून गेले.पोलिसांच्या माहितीनुसार, ही बस ठेकेदाराकडील आहे. वाहतूककोंडी झाल्याचे समजताच सकाळी सकाळी वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक भगवान सावंत आणि हवालदार खराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच वारंवार पीएमपीच्या अधिका-यांना आणि नियंत्रण कक्षाला फोन बस हलविण्यासंदर्भात विनंती केली. मात्र, पीएमपीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांचे स्वीय सहायक हांडे यांनाही संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. मात्र, अधिकार्यांची बैठक सुरु असल्याचे कारण देत वेळ मारुन नेण्यात आली. हा प्रकार दुपारी दीड वाजेपर्यंत सुरु होता. पीएमपी प्रशासनाचा बेजाबदारपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. बस विरुद्ध बाजुने का नेण्यात आली आणि रस्त्याच्या मधोमध का उभी करण्यात आली याबाबत कोणीही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही.
वाहनचालकांची बसली पाचावर धारण!!! उलट्या बाजूने आलेल्या पीएमपीने रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:56 PM
वर्दळीच्या स्वामी विवेकानंद रस्त्यावर भल्या सकाळी पीएमपी बस रस्त्याच्या उलट्या बाजूने घुसल्यामुळे समोरुन येणार्या वाहनचालकांची पाचावर धारण बसली.
ठळक मुद्देबस बंद करुन रस्त्यामध्ये तशीच बेवारस सोडून चालक आणि वाहक दोघेही गायबपीएमपी प्रशासनाचा बेजाबदारपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर