पिंपरी : माल व प्रवासी वाहतूक चालकांना वाहन पासिंगसाठी दोन ते तीन दिवस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ)खेटे मारावे लागत आहेत. दूर अंतरावरुन आलेल्या चालकांना आपल्या नियमित व्यवसायावर पाणी सोडत येथे नाईलास्तव दिवसभर थांबण्याची वेळ आली आहे. शुल्क आगाऊ भरुनही अधिकारी वाहन तपासत नसल्याचे चालकांची गेल्या महिन्याभरापासून मोठी गैरसोय होत आहे. या संदर्भात तक्रारी करुनही अधिकारी दखल घेत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टेम्पो, मोटारी, बसेस, ट्रक, कंटेनर आदी लहान आणि अवजड वाहनांची दरवर्षी तपासणी करुन परवाना नुतनीकरण करावे लागते. या पासिंगसाठी अगोदर शुल्क भरले जाते. ४०० ते ६०० रुपये इतके शुल्क आहे. तसेच, १५ वर्षे पुर्ण झालेल्या वाहनाचा पर्यावरण कर भरुन तपासणी करावी लागते. यासाठी दररोज चिखली स्पाईन रस्ता येथील नव्या कार्यालयात १५० ते २०० वाहने पासिंगसाठी येतात. सुट्टीच्या दिवशी त्यात आणखी भर पडते. एक अधिकारी दिवसाला साधारण २५ वाहने तपासतो. सकाळी दहाची वेळ असाताना अधिकारी बारा वाजता येऊन वाहनांची तपासणी करुन निघून जातात. त्यानंतर उर्वरित वाहने रांगेत उभी करुन चालक प्रतिक्षा करीत थांबतात. कधी एक तर कधी दोन अधिकारी उपस्थित असतात. ५० वाहनांच्या तपासणीनंतर शिल्लक वाहने आपला क्रमांक येईल म्हणून सायंकाळपर्यत थांबून राहतात. अधिकारी येण्याची वेळ टळल्यानंतर ते माघारी फिरतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी रांग लागते. पुन्हा कालच्या इतकी वाहने तपासून अधिकारी गायब होतात. लोणावळा, खेड, जुन्नर, आंबेगाव, चाकण, मावळ, हिंजवडी, शिक्रापूर आदी दूर अंतरावरुन वाहनचालक येथे येताते. हेलपाटा नको म्हणून काही चालक तेथेच मुक्काम करतात. थंडीत कडकुडत त्यांना रात्र काढावी लागते. येथे पाणी आणि जेवण्याची सोय नसल्याचे चालकांची मोठी गैरसोय होते. हा प्रकार महिन्याभरापासून सुरू असल्याचे तक्रारी वाहनचालकांनी केल्या. शुल्क आगाऊ भरुनही वाहनाचे पासिंग केले जात नसल्याचे खंत एका टेम्पो चालकांने व्यक्त केली. गेल्या तीन दिवसांपासून कार्यालयाच्या चकरा मारत असल्याचे डांगे चौक, थेरगाव येथील चालकांने सांगितले. अधिकारी वर्ग चालकांशी सौजन्याने वागत नसून, दिवसभर थांबवून ठेवतात, अशी तक्रार कुरळी, चाकणहून आलेल्या टेम्पोचालकांने केली. आज गुरुवारी दुपारी बारा ते एक या वेळेत अधिकारी आले आणि २३ वाहने पास केली आणि ७ वाहने बाद करीत निघून गेले. ७२ वाहने शिल्लक आहे. काही वाहनचालक वैतागून निघून गेले. सायंकाळी पाचपर्यत रांगेत होती, या गैरसोयीबात उपस्थित चालकांनी तीव्र मनस्ताप व्यक्त केला. काहीनी आंदोलनाचा पवित्रा बोलून दाखविला. चालकांनी कार्यालयात गोंधळ घातल्यानंतर अधिकारी अमरसिंह गवारे यांनी चालकांना शांत करीत शिल्लक चालकांच्या अर्जावर क्रमांक टाकून उद्या शुक्रवारी येण्यास सांगितले. मात्र, उद्या नव्यांने येणारी वाहने ही शिल्लक वाहन यांच्या तपासणीवरुन वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.(प्रतिनिधी)
शुल्क भरूनही वाहनचालक दोन दिवस रांगेत
By admin | Published: December 05, 2014 5:09 AM