पुणे :पुणे शहरात जी २० परिषदेचे १६ व १७ जानेवारीच्या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून शहर परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरणास पोलिसांनी बंदी घातली आहे. विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर.राजा यांनी हा आदेश काढला आहे.
या परिषदेला २९ देशांतील प्रतिनिधी आणि १५ आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी असे जवळपास २०० मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे मान्यवर सेनापती बापट रोडवरील जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेल येथे राहणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर स्थळांना भेटी देणार आहेत. त्यांच्या जीवितास कोणताही धोका उद्भवू नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. असामाजिक तत्त्वांकडून ड्रोनचा वापर करून घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरात १० ते २० जानेवारीच्या दरम्यान ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे छायाचित्रणास मनाई करण्यात आली आहे.