सांगवी (बारामती, पुणे) : दिवसा व रात्री गावात ड्रोन फिरला की दुसऱ्या दिवशी एखाद्या घरात हमखास घरफोडी चोरी होऊन चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास करून रोख रक्कमेची चोरी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली आहे. या घटना आता फक्त बारामती तालुक्यापुरत्या मर्यादित न राहता दौंड, इंदापूर या शेजारील तालुक्यांनी देखील उडणाऱ्या ड्रोनचा धसका घेतला आहे. परिसरात एक चोरी झाली की दुसरी चोरी घडल्याची घटना समोर येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे पोलीस हे ड्रोन नसल्याचे सांगत शिकाऊ विमान विमान असल्याचा दाखला देत नागरिकांचे तोंड बंद केले जात आहे. यामुळे रात्रीस चोरट्यांकडून हा खेळ दोन तीन तालुक्यामध्ये सुरू आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हाट्सअप ग्रुपवर रात्री अपरात्री फिरणाऱ्या ड्रोनचीच भीतीयुक्त चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक गावांत घरांच्या वरुन लाईटचा प्रकाश असणारे घिरट्या मारणारे नक्की ड्रोन की इतर काही आहे. याबाबत अनेक चर्चांना आता उधाण आले आह. चोरटे चोरी करण्यासाठी नक्की ड्रॉन कॅमेराचा वापर करतात का? अशा अनेक शंका येऊन तालुक्यातील ग्रामस्थ भयभीत होऊन प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. बारामती पोलिसांनी या सर्व प्रकारची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतं आहे.
बारामतीत अनेक वर्षे दररोज शिकाऊ विमाने दिवसा व रात्री उड्डाणे घेत असतात याबाबत सगळ्यांनाच कल्पना आहे. अशात अनेक ग्रामस्थांना सतत ड्रोन उडताना देखील पाहायला मिळाले आहेत. त्यात आता अनेक ठिकाणी घरफोड्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. बारामती तालुक्यात अनेक गावांत मागील काही दिवसांपासून सातत्याने घरफोडीच्या घटना घडत असून पैशांसह मौल्यवान वस्तूंच्या चोरी होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. वडगाव निंबाळकर, बारामती ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांत हे ड्रोन फिरत आहेत.
पोलिसांकडून खुलासा मात्र होईना -
चोरटे घरफोडी करत चोरी करुन प्रसार होत असल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत. दरम्यान परिसरात रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेरे घरासमोरून फिरत असल्याचे अनेक नागरिकांना दिसले आहे. चोरटे ड्रोन कॅमेरा चा वापर करून घरात किती व्यक्ती आहेत? हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ते ड्रोन कॅमेराचा वापर करीत असावेत अशी शंका नागरिक उपस्थित करू लागले आहेत. हे ड्रोन कॅमेरे आहेत का आणखी दुसरे काही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान या सर्व प्रकारांचा पोलीसांनी पुरेपूर तपास लावावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, याबाबत पोलिसांशी नागरिकांनी संपर्क साधल्यास घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत ते शिकाऊ विमानाच्या लाइटी असल्याचे सांगून अंग झटकून दिले जात आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी परिसरात घरफोड्या झाल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे बारामतीचे पोलीस या ड्रोन चा शोध लावण्यास अपयशी ठरल्याचे चित्र आहॆ. त्यामुळे पोलिसांना देखील याचा सुगावा लागत नसल्याचे चित्र आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली गंभीर दखल -
बारामतीच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. यानंतर पवार यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोनद्वारे या ड्रोन उडवणाऱ्या आरोपींचा व घडणाऱ्या घटनांचा लवकरात लवकर तपास लाउन नागरिकांना दिलासा देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
नक्की कांय प्रकार चालू आहे हे न उलघडणारे कोडे -
नागरिकांकडून ड्रोन कॅमेरेच्या संदर्भात तक्रारी आल्या होत्या मात्र त्याची पोलिसांनी काही ठिकाणी खात्री केली पण ते ड्रोन कॅमेरे असल्याचे आढळून आले नाही. तरीही पोलीस त्या अनुषंगाने सखोल तपास करीत आहेत. मात्र नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात असतांनाच घरफोड्या चोऱ्या होऊ लागल्या आहेत. यामुळे बारामती तालुक्यात नक्की कांय प्रकार चालू आहे हे न उलघडणारे कोडे झाले आहे.