पुणे : जिल्ह्यातील मावळ, मुळशी खेड तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये पावसाच्या अभावामुळे शेतीबाबत परिस्थिती गंभीर आहे. मात्र, पाऊस पडूनही केवळ सातत्य नसल्याने जुन्नर, वेल्ह्यासह काही ठिकाणची भातासह इतर पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने आणि अनेक ठिकाणी पावसाचे सातत्य नसल्याने खरीपाची पिके संकटात सापडली आहेत. जिल्हयातील मावळ, मुळशी, खेड तालुके सोडून इतर दहा तालुक्यांमधील स्थिती गंभीर आहे. इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जुन्नर तालुक्यात सरासरीच्या १२७ टक्के पावसाची नोंद झाली. मात्र, पावसाचे सातत्य नसल्याने तेथील भात पीक वाया गेले आहे. त्यामुळे या तालुक्यातही शासनाची मदत पोहचवली जाणार आहे. वेल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. बुधवार अखेरीस (दि. २४) गुंजवणी धरणात ३ अब्ज घनफूट (८३ टक्के) पाणीसाठा आहे. मात्र, अखेरच्या टप्प्यात पाऊस झालाच नाही. परिणामी येथील पिके देखील संकटात सापडली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा आहे. या शिवाय ६० लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. हा चारा जानेवारीपर्यंत पुरू शकणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळजन्य दहा तालुक्यांपैकी इंदापूर, दौंड, बारामती आणि शिरुर या चार तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक दुष्काळसदृश्य स्थिती असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी दिली. आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हे या दहा तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
जिल्ह्यात पाऊस पडून देखील दुष्काळजन्य परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 7:17 PM
जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने आणि अनेक ठिकाणी पावसाचे सातत्य नसल्याने खरीपाची पिके संकटात सापडली आहेत.
ठळक मुद्देजुन्नर तालुक्यात सरासरीच्या १२७ टक्के पावसाची नोंद इंदापूर, दौंड, बारामती आणि शिरुर या चार तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक दुष्काळसदृश्य स्थिती जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा जिल्हा प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू