बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
दुष्काळी आढावा बैठकीत पिण्याचे तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने या बैठकीचे आयोजन करावे, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे. या पूर्वी सप्टेंबर महिन्यात देखील सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केली होती.
जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यात अद्यापही पावसाचे प्रमाण अत्यल्प असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन चारा छावण्या तसेच पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या मागणीचा यात समावेश यामध्ये होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी सप्टेंबर मध्ये ही मागणी केली होती.