बारामती / मोरगाव : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाच्या नशिबी असणारी दुष्काळाची पीडा मागील पाच वर्षांपासून हटेना. पाण्याचे कायमच दुर्भिक्ष्य असणाऱ्या या परिसरात पुरंदर व जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना वाजत-गाजत आणल्या गेल्या. मात्र या सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने आजही या पसिरात पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. सध्या जनाई-शिरसाई योजनेतून सुपे परिसरात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सलग पाचव्या वर्षी जिरायती भागाला पावसाने हुलकावणी दिली. सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसाच्या भरवशावर येथील शेतकऱ्यांनी खरिपाच्या सुमारे ११ हजार हेक्टरवर पेरण्या केल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने बाजरी व चारापिकांचे क्षेत्र अधिक होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून पावसाने या भागात तोंड दाखवले नाही. त्यामुळे खरीप हंगाम पुरता वाया गेला. यानंतर येणारा रब्बी हंगामदेखील शेतकऱ्यांना तारणार का, या चिंतेत सध्या येथील शेतकरी आहे. तालुक्याच्या पश्चिम भाग कायम दुष्काळी म्हणून प्रसिद्ध आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या जोगवडी, आंबी, मोरगाव, तरडोली, मुर्टी, मोराळवाडी, लोणी भापकर, सायबाचीवाडी, मोडवे, जळगाव, भिलारवाडी आदी गावे लाभक्षेत्रात येतात. मागील दोन वर्षांपूर्वी विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने या योजनेचे उद्घाटन केले. परंतु या योजनेचे पाणी तालुक्याच्या जिरायती भागात केवळ उद्घाटनापुरतेच, तर बहुतांश योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे. या भागातील गावांना टंचाई निवारण निधीतून या योजनेचे वीजबिल भरण्यासाठी जिरायती भाग पाणी परिषद व शेतकऱ्यांनी जनावरांसहित तरडोली येथे २ जुलै रोजी आंदोलन केले. मात्र तरीही येथील जनता शेतीसाठी पाणी पाणी करीत आहे. यामुळे जनतेच्या दु:खावर फुंकर मारण्यासाठी सहा गावांतील मूठभर लोकांसाठी पाणी सोडले जाणार आहे. खरीप तर गेलाच, पण रब्बीची पेर तरी या आशेवर शेतकरी आहेत. यासाठी शेतकरी नेहमीसारखी पुरंदर उपसा सिंचनच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. (वार्ताहर)
जिरायती भागातील दुष्काळ हटेना
By admin | Published: September 13, 2016 1:22 AM