इंदापूर : गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण २४५.८८ मिलिमीटरने घटले आहे. पाऊस दडला, जमिनी कोरड्या पडल्या. मका सोयाबीन बाजरी ही पिके सुकून चालली आहेत. शेतकऱ्यांचा धीर भेगाळत चालला आहे. पावसाने दडी मारल्याने दुष्काळ पसरत जाणार असल्याचे विषण्ण चित्र इंदापूर तालुक्यात निर्माण झाले आहे.
इंदापूर हा रब्बीचा तालुका आहे. परंतु खरीप हंगामात बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भाजीपाला व चाऱ्याची पिके घेतली जातात. तालुक्यात नेहमी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडतो. जून महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात व संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पाऊस पडतो. या पावसावरच खरीप हंगामातील पिके तग धरून असतात. गतवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत तालुक्यात ३७९.३८ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदाच्या वर्षी तो १३३.५ मिलिमीटरवरच थबकला आहे.
यंदाच्या वर्षी पावसाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या तुलनेत जादा ११०.६ हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी केली होती. भाजीपाल्याचे क्षेत्र देखील ९४३.२ हेक्टरने वाढले होते. बाकीच्या पिकांची लागवड त्यांच्या सरासरी क्षेत्रापेक्षा व मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी घटली आहे. मात्र, पेरणी झालेल्या पिकाला पावसाने दगा दिल्याने ती पिकेदेखील वाया जाणार असल्याचे चिन्ह दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
मक्याच्या पिकात १ हजार ११९.३ हेक्टरने घट
बाजरीच्या पिकाचे सरासरी क्षेत्र १ हजार २०५ हेक्टर आहे. गेल्या वर्षी ६२६ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली होती. यंदाच्या वर्षी हे क्षेत्र ११०.६ हेक्टरने वाढलेले आहे. बाजरीला फुटवे येण्याच्या वेळेस, पीक पोटरीच्या अवस्थेत असताना व कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे असते. मक्याच्या पिकाचे तालुक्यातील सरासरी क्षेत्र ७ हजार ८५२ हेक्टर आहे. गेल्या वर्षी १३ हजार ८३६.३ हेक्टर पेरणी झाली होती. यंदा १ हजार ११९.३ हेक्टरने घट झाली आहे. १२ हेक्टर ७१७ हेक्टर क्षेत्रावर मक्याचे पीक घेण्यात आले आहे. बाष्पीभवनामुळे पानांतून अधिकचे पाणी बाहेर टाकले जाते. त्यामुळे मक्याच्या पिकाला पाण्याची अधिक गरज असते. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडला तर पीक हातातून जाण्याची वेळ येणार आहे.
तूर धोक्यात, तर १० हेक्टरवरच मूग
तुरीचे सरासरी क्षेत्र २७७ हेक्टर आहे. गतवर्षी ११६.५ तर यंदा ९५.५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. २१ हेक्टर क्षेत्राची घट झाली आहे. पाऊस कमी झाल्यानंतर या पिकास पाण्याचा मोठा ताण पडला असल्याचे आढळल्यास फुलकळी लागताना पहिले पाणी द्यावे लागते. ते फुलोऱ्यात आल्यानंतर दुसरे, शेंगांमध्ये दाणे भरताना तिसरे पाणी द्यावे लागते. यंदा पावसाचाच पत्ता नसल्याने तुरीचे पीक धोक्यात आले आहे. मुगाचे सरासरी क्षेत्र ६९ हेक्टर आहे. मागील वर्षी त्यामध्ये वाढ होऊन ते ९६ हेक्टरवर पोहोचले होते. यंदा त्यामध्ये ८६ हेक्टर एवढी घट झाली आहे. केवळ १० हेक्टर पेरणी झाली आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी महत्त्वाच्या असत्ऱ्या मुगाच्या पिकाला पाणी कमी लागते. पण, ते ही सध्या उपलब्ध नाही, अशी स्थिती आहे. उडीद पिकाखालचे सरासरी क्षेत्र १२३ हेक्टर आहे. गतवर्षी वाढ होऊन १६५.६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा त्याच्यात १०४.९ हेक्टरने घट झाली आहे. ६०.७ हेक्टर उडीद पेरण्यात आला आहे.
७ हजार १७१ हेक्टरवर चाराची पिके
सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ११४ हेक्टर आहे. गतवर्षी त्याच्यामध्ये चांगलीच वाढ होऊन ३६३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदा त्याच्यामध्ये १४३ हेक्टरने घट झाली आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वाफशावर सोयाबीनची पेरणी करावी लागते. पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी फांद्या फुटताना व पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना या पिकाला पाण्याची आवश्यकता असते. पावसाने ताण दिल्याने या पिकाचे नियोजन कोलमडून पडल्याचे चित्र आहे. चाऱ्याच्या पिकाचे सरासरी क्षेत्र ३ हजार ४१६ हेक्टर आहे. गतवर्षी ८ हजार २७९.६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदाच्या वर्षी १ हजार १०८ हेक्टरने घट झाली आहे. ७ हजार १७१ हेक्टरवर चाऱ्याची पिके घेण्यात आली आहेत.