खोर : जनावरांना खायला डोंगरमाथ्यावरील वाळलेला चारा... पाण्याअभावी वाळून गेलेल्या फळबागा..एकाच टँकरचे रात्रीच्या वेळीदेखील कधीही होणारे आगमन. पाण्याच्या ढिसाळ नियोजनाअभावी गाढ झोपेतून खडबडून जागे होऊन पाणी भरण्यासाठी लावाव्या लागणाऱ्या रांगा... कोरड्याठाक पडलेल्या विहिरी... अशा गंभीर परिस्थितीत खोर (ता. दौंड) परिसर सापडला आहे. एकंदरीतच, खोर परिसरावर दुष्काळाचे गंभीर सावट जाणवत आहे. पाणीटंचाईच्या गंभीरस्थितीमुळे दैनिक व्यवहार, जनजीवन ढासळले असल्याचे चित्र आहे. एकीकडे अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अंजीर, डाळिंब यांच्या फळबागा सुकून गेल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. या भागातील शेतकरीवर्गाचा आधार असलेल्या शेततळ्यांमधीलदेखील पाणी संपुष्टात आले असल्याने शेती पडीक ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. या दुष्काळी भागाची छाया आणखीणच गडद होण्याआधी पुरंदर जलसिंचन योजना अथवा जनाई-शिरसाईसारख्या योजना कार्यान्वित करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आली आहे. सिंचनाच्या योजना खोर परिसराच्या उशाशी असूनदेखील या योजनांचा लाभ घेण्यापासून हा परिसर वंचितच राहिला आहे. लवकरात लवकर या योजना कार्यान्वित करून एखादे आवर्तन डोंबेवाडी पाझर तलावात अथवा फडतरेवस्ती तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. पाणीप्रश्न गंभीर बनला असून, पंचायत समितीकडून पाण्याचा एक टँकर सुरू आहे. मात्र, तालुक्याच्या इतर भागांमध्येदेखील पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने व पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या ढिसाळ नियोजनामुळे कधीही टँकर खेपा घेऊन खोर परिसरामधील वाड्यावस्त्यांवर येत आहे. महिलांना रात्रीच्या वेळी रांगा लावून पाणी भरण्याची वेळ आली आहे.
खोर परिसरावर दुष्काळ अधिक गडद
By admin | Published: March 11, 2016 1:45 AM