भोर : भोर एसटी स्टँडची संरक्षण भिंत पडलेली, रस्त्यावर मोठमोठे खड्डे, मुतार्या, पिण्याच्या पाणपोईची दुरवस्था झाली आहे. लाखो रुपये खर्च करून निकृष्ट काम व एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्टँडची अवस्था निर्माण झाली आहे. एसटी स्टँडची जुनी इमारत खराब झाल्याने तीन वर्षांपूर्वी नव्याने इमारत, संरक्षण भिंत व आतील डांबरीकरण करण्यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. सर्व कामेही झाली. मात्र, तीन वर्षांत निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे संरक्षक भिंत एका ठिकाणी पडली. तिची दुरुस्ती केल्यावरही पुन्हा पडली आहे, तर स्टँडमधील डांबरीकरणाचे कामही खराब झाल्याने त्यालाही मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय, सार्वजनिक मुतार्यांत कचरा, बाटल्या, घाण आहे. पिण्याच्या पाण्याची जुन्या बसस्टँडजवळची पाणपोई खराब झाली आहे. डांबरीकरण करताना योग्य प्रकारे उतार दिला नाही. गटारे काढली नाहीत; त्यामुळे दर पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही. डांबरीकरणाला खड्डे पडलेत. त्यात पावसाचे पाणी साचते. परिसरातील स्वच्छतेचा अभाव, त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्चुन बांधलेल्या एसटी स्टँडची व परिसराची मोठी दुरवस्था झाली आहे. याकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बसस्टँड अवैध वाहतूक, जीपगाड्या, हातगाड्यांच्या विळख्यात : एसटी बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला अवैध वाहतूक करणार्या जीपगाड्या, त्याचबरोबर विविध प्रकारच्या स्टॉलचा विळखा आहे. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होते. नव्याने बांधलेल्या परिसरात झाडे लावण्यात आली होती. मात्र, त्यातील एकही झाड सध्या जिवंत नाही. त्या वेळी मात्र गाजावाजा करून राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण झाले. नेत्यांनी पाठ फिरवल्यावर एसटी प्रशासनानेही झाडांकडे पाठ केल्याने ही अवस्था झाली. (वार्ताहर)
भोर एसटी स्टँडची दुरवस्था
By admin | Published: May 16, 2014 4:42 AM