पुणे : अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियन आणि येमन देशातील दोन नागरिकांना गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोध पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ३५ हजार रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले. त्यात कॅथा इडुलिस खत हा अमलीपदार्थ पुण्यात प्रथमच सापडला आहे.
कोंढवाजवळ उंड्री परिसरात नायजेरियन नागरिक कोकेन विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार पांडुरंग पवार यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, निरीक्षक शैलेजा जानकर यांच्या पथकाने फेलिस्क ऐजे एकेचुकु (५२, रा. उंड्री) याच्याकडून चार लाख ६३ हजारांचे २३ ग्रॅम कोकेन, मोबाइल, दुचाकी असा साडेपाच लाखांचा ऐवज जप्त केला.
दुसऱ्या कारवाईत येमन नागरिक अल-सयाघी अब्दुलेलाहा अब्दुल्ला अहमद (२९, रा. कोंढवा) याच्याकडून पाच लाख ८७ हजारांचा कॅथा इडुलिस खत अमलीपदार्थ, दोन लाखांची रोकड, मोबाइल असा आठ लाख ७४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
कॅथा इडुलिस खत
कॅथा इडुलिस खत याचा अमलीपदार्थामध्ये २०१८ मध्ये समावेश केला आहे. हा चहापत्तीसारखा दिसतो. त्यामुळे तो सहसा ओळखता येत नाही. आपल्याकडील गांजासारखा हा अमलीपदार्थ येमन देशातून येतो. अनेक परदेशी मेडिकल व्हिसावर भारतात येतात. ते येताना ही तस्करी करतात. गांजा साधारण २० हजार रुपये किलो दर असून, कॅथा इडुलिस खतचा दर ७० हजार रुपये आहे. हा ओला असेल तर तो पाला चावून, चघळतात. कोरडा असेल तर पाण्यात उकळून ते पाणी पितात. पुण्यात प्रथमच यावर कारवाई झाली आहे. मुंबईत दोन वर्षांपूर्वी कारवाई झाल्याचे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले.