पुणे : तुमच्या नावाने मुंबईवरून तैवान येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार कल्याणीनगर परिसरात घडला. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर कुरिअर ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगत तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश दामोदर नारखेडे (४७) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञाताने १८ डिसेंबर २०२३ रोजी संपर्क साधला. तुमच्या नावाने मुंबई येथून तैवानला पार्सल पाठवण्यात आले आहे, त्यामध्ये २५० ग्रॅम ड्रग्ज आहे. ते पार्सल मुंबई क्राइम ब्रँचमध्ये असल्याचे सांगितले. तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर लगेच सायबर सेलला तक्रार करा. तुमचा कॉल मुंबई येथे सायबर सेलला जोडून देतो सांगून डीसीपी बोलत असल्याचा बनाव केला. महम्मद मलिक नावाची व्यक्ती तुमच्या नावे बँक अकाउंट वापरत असल्याचे सांगितले. खाते व्हेरिफाय करण्यासाठी बँक खात्याची माहिती घेऊन एकूण ३० लाख ३६ हजार ६९९ पाठवण्यास सांगितले. त्यापैकी ९ लाख ४८ हजार ७४६ रुपये परत पाठवून फिर्यादीची एकूण २० लाख ८७ हजार ९५३ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात मोबाइलधारकाच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम पुढील तपास करत आहेत.
अशी घ्या काळजी
- तुम्ही पार्सल पाठवले नसल्यास घाबरू नका.
- असा फोन आल्यास सर्वांत आधी सायबर पोलिसांना कळवा.
- कोणतेही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नये.
- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.