पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील बंडगार्डन, मार्केट यार्ड आणि कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिघा अमली पदार्थ तस्करांना पकडले. त्यांच्याकडून चरस, गांजा आणि मेफेड्रोन (एमडी) असे ९ लाख ३४ हजारांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सुरेश सिद्धाराम नाटेकर (वय ३३, रा. गंगाधाम मार्केट यार्ड) याला ११ डिसेंबर रोजी पकडले. त्याच्या ताब्यातून २ लाख ३१ हजार रुपयांचे २३१ ग्रॅम चरस जप्त केले. त्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच कोरेगाव पार्कातील सार्वजनिक रस्त्यावर १३ डिसेंबर रोजी सापळा रचून ओडिशा राज्यातून आलेल्या आकाशचंद्र पार्थव नायक (वय २७, रा. ओडिशा) याला पकडले. त्याच्या ताब्यातून ४ लाख ८३ हजार रुपयांचा २४ किलो गांजा जप्त केला. तसेच त्याच्या विरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुणे स्टेशन परिसरात सापळा रचून जावेद अजीज सय्यद (वय ३३, रा. मिठानगर, कोंढवा) याला पथकाने १५ डिसेंबर रोजी सापळा रचून अटक केली. त्याच्या अंगझडतीत २ लाख २० हजार रुपयांचे मेफेड्रोन मिळून आले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस. डी. नरके, कर्मचारी मयूर सूर्यवंशी, साहिल शेख, आझीम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे यांच्या पथकाने केली.