कर्वेनगर (पुणे) : कर्वेनगर मावळेआळीमधील चौक म्हणजे मद्यपींचा अड्डाच झाला आहे. अनेक महिन्यांपासून या ठिकाणी अवैध धंदे सुरू असून, वारजे पोलीस या व्यवसायांना छुपा पाठिंबा देत आहेत. मद्यपींकडून महिलांना खुलेआम छेडछाड करण्यात येत आहे. मात्र, तरीही पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने, स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे.
कर्वेनगर मावळे आळी चौक हे व्यवसायाचे ठिकाण असून, या ठिकाणी अनेक हातगाड्या, तसेच भाजी विक्रेते विविध साहित्यांची किराणामाल यांची दुकाने असून, नागरिकांची विशेषत: महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, पण या अवैध धंद्यांमुळे मद्यपी रस्त्यावर धिंगाणा घालत अश्लील वर्तन करतात.
त्यामुळे या चौकात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांच्या मनात मद्यपींची भीती निर्माण झाली आहे. अनेकदा छेडछाडीच्या घटना घडत असून, वारजे पोलीस अतिशय नम्रपणे बघ्याची भूमिका बजावतात, असा आरोपी स्थानिकांनी केला आहे, तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी वारजे पोलीस विसरत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
येथे वारजे पोलिसांनी दामिनी पथक कायम उपस्थित करावे, तसेच रात्री गस्तिपथके वाढवावी. मद्यपींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.
महिलांचा सुरक्षेसाठी पोलीस धाडसी उपाययोजना राबवत आहेत. या भागात अवैध धंदे सुरू असतील, तर तातडीने जागा मालकासह चालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- रुक्मिणी गलांडे, सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग