- हेमंत बावकर
Pune Accident : पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आणखी एका धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात मद्यपी ट्रक चालकाने पुण्यात भरधाव टेम्पो चालकाने अनेकांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत या अपघातात सात ते आठजण जखमी झाले आहेत. या अपघातात दोघांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुण्याच्या कोथरुड भागात हा भीषण अपघात झाला. कोथरूडमध्ये छोट्या टेम्पोने आधी करिश्मा चौकातील सिग्नलला दोन लहान मुलांना उडवले. मद्यपी टेम्पो चालक एवढ्यावरच थांबला नाही. त्याने टेम्पो तसाच पुढे नेला आणि काही गाड्यांच्या अंगावर वाहन नेले. त्यानंतर पौड फाटा येथे सावरकर उड्डाण पुलाजवळील सिग्नल तोडत दोन स्कूटींना धडक दिली. यानंतर टेम्पो चालकाने एका कारला आपलं वाहन धडकवलं.
करिश्मा चौकापासून मद्यधुंद टेम्पो चालक सात ते आठ जणांना उडवत आला. त्यानंतर टेम्पो चालकाने सावरकर उड्डाण पुलाखाली तीन जणांना उडवले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहेत. अपघातातील जखमींना सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे टेम्पो चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. टेम्पो चालवताना देखील तो डोळे झाकत होता. या घटनेनंतर जमावाने टेम्पो चालकाला खाली उतरवत मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहराच्या काही भागात मद्यविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले होते. त्यानुसार मद्यविक्री बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी दिला होता.