पुणे: मुंबई, ठाण्यासह कोकणात अतिवृष्टीचा इशारा देऊन हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता. हवामान विभागाच्या अलर्टमुळे सर्व जण सतर्क झाले. मात्र, अपेक्षित पाऊसच झाला नाही. यामागे कारण आहे ते आफ्रिकेतून आलेल्या कोरड्या (शुष्क) हवेमुळे ढगांची निर्मिती झाली असली तरी त्यात वाढ न झाल्याने अंदाजानुसार पाऊस झाला नाही, हे कारण समोर आले आहे. हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सोमवारीही रेड अलर्ट दिला आहे. तसेच संपूर्ण कोकणात यलो अलर्ट दिला आहे. मात्र, त्यानुसार अपेक्षित पाऊस रविवारी कोठेही झाला नाही.
याबाबत ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, साधारण जमिनीपासून ३ ते ५ किमी उंचीवर ढगांची निर्मिती होऊन पाऊस होत असतो. ढगांची निर्मिती, वाऱ्याचा वेग, बाष्पभवन, आर्द्रता या सर्वांचा विचार करून त्यानुसार अनुमान बांधले जाते. त्यातूनच कोकण व मुंबईतील पावसाबाबत अनुमान बांधले गेले असावे. मात्र, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या वाळवंटातून कोरडी हवा आपल्याकडे आली. या घटकामुळे ढगांची निर्मिती झाली तरी त्यात वाढ न झाल्याने पाऊसमान कमी झाले आहे. ही हवा काही एका दिवसात आलेली नाही. तिचा प्रवास मागील २ ते ३ दिवस सुरू असणार. या घटकाकडे दुर्लक्ष झाले असावे, त्यातूनच अंदाज चुकला आहे.
मॉन्सून स्थिरावत असताना त्याचा जोर असतो. तो जसा पुढे जातो, तसा त्याचा मागे जोर कमी होतो. आता मॉन्सून उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळेच आपल्याकडील पाऊसमान कमी झाले आहे. ही परिस्थिती अजून दोन तीन दिवस राहण्याची शक्यता असल्याचे डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले