शिरूर : नगर परिषद व्यापारी संकुलातील बेसमेंटमध्ये असलेल्या ‘क्वालिटी ड्रायक्लिनर्स’ या दुकानाला काल रात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानातील ड्रायक्लिनिंगसाठी आलेले सर्व कपडे, फर्निचर भस्मसात झाले. प्रसंगावधान राखून वेळीच आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. नगर परिषद कार्यालयाशेजारी नगर परिषदेचेच व्यापारी संकुल आहे. या संकुलात शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे यांचे बेसमेंटमध्ये क्वालिटी ड्रायक्लिनर्स नावाचे दुकान आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. यामुळे ड्रायक्लिनिंगसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचे कपडे दुकानात होते. काल रात्री शितोळे यांनी रात्री साडेदहाला दुकान बंद केले. सव्वाअकराच्या सुमारास त्यांच्या दुकानाच्या शटरमधून धूर येत असल्याचे त्यांना भ्रमणध्वनीवर कळविण्यात आले. यावर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत दुकानाकडे धाव घेतली. शटर उघडले असता, दाराच्या उजव्या बाजूने आगीचा लोळ बाहेर आला. आग विझवण्यासाठी पाणी आणेपर्यंत आगीने अर्धे दुकान व्यापले होते. गावात कोठेही आग लागल्याचे कळताच पाण्याच्या टॅँकरसह धावून येणाऱ्या संपत दसगुडे यांना याबाबत माहिती मिळताच ते टॅँकर घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जिवाची पर्वा न करता आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कपड्यांनी आग पकडल्याने काही वेळातच पूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुकानात २५० किमती साड्या, दोन हजार शर्ट-पॅण्ट, ३० थ्रीपीस कोट, २० ते २५ शेरवानी व इतर कपडे असा माल होता. हा सर्व माल आगीत भस्मसात झाला. दसगुडेंसह नगर परिषदेच्या अग्निशमन तसेच एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग विझविली. दरम्यान, आगीची माहिती मिळाली असता, नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल, रवींद्र ढोबळे, विजय दुगड, मुजफ्फर कुरेशी, प्रशांत शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचे धाडसशहरात जेव्हा जेव्हा आग लागली, तेव्हा तेव्हा संपत दसगुडे या तरुणाने घटनास्थळी स्वत:च्या पाण्याचा टॅँकर घेऊन धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानाप्रमाणे धाडसाने आग विझवण्याचा नेहमी प्रयत्न केला. कालही ते वेळेत पोहोचले. त्यांच्यामुळे आगीची तीव्रता कमी झाली. आग इतरत्र पसरली नाही.
ड्रायक्लिनरचे दुकान आगीत भस्मसात
By admin | Published: February 28, 2016 3:41 AM