पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीसाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या रविवारपासून (२९ नोव्हेंबर) चार दिवस मद्यविक्री, परमिट रूम आणि मद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख दिले आहेत. त्यानुसार २९ आणि ३० नोव्हेंबर तसेच १ आणि ३ डिसेंबरला मद्यविक्री बंद असणार आहे.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुका असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत. मतदान दिवसाच्या 48 तास अगोदर मद्यविक्री आणि मद्यालये बंद ठाण्यांच्या हद्दीमधील दुकाने आणि मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार २९ नोव्हेंबरला सायंकाळी पाचनंतर मद्यविक्री दुकाने आणि मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. ३० नोव्हेंबर हा मतदानाच्या अगोदरचा दिवस असल्याने संपूर्ण दिवस मद्यविक्री व दुकाने आणि मद्यालये बंद असणार आहेत.१ डिसेंबरला मतदान असून मतदानाची वेळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. मतदान संपल्यानंतर दुकाने आणि मद्यालये उघडली जाणार आहेत. २ डिसेंबरला निवडणुकीविषयी कोणतेही कामकाज नसल्याने या दिवशी दुकाने आणि मद्यालये खुली राहणार आहेत. ३ डिसेंबरला मतमोजणी असून, मतमोजणी असलेल्या पोलीस ठाण्यात मद्य विक्री बंद ठेवण्यात येणार आहेत.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधिक्षक संतोष झगडे, निवडणूक आयोगाच्या सूचना आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या चार दिवस दिलेल्या वेळांमध्ये मद्य विक्रीची दुकाने आणि मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाचे पालन होण्यासाठी संबंधित विभागाच्या निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या असल्याचे देशमुख यांनी सांगितले.