लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्थलांतरित कामगारांसाठी कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने महत्त्वाच्या सर्व रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष सुरू केले आहे. स्थलांतरित मजुरांना या कक्षाकडून गाड्यांची माहिती तसेच कोरडा शिधा, पाणी दिले जाते. मुंबई, पुणे यासह सर्व विभागांमध्ये असे कक्ष सुरू केले आहेत.
पुणे विभागात अतिरिक्त कामगार आयुक्त कार्यालयाकडून पुणे रेल्वे स्थानकासह, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर रेल्वे स्थानकांमध्ये असे कक्ष कार्यान्वित केले आहेत. तिथे नोडल ऑफिसर तसेच काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे स्थानकामंध्ये गाडीची बराच काळ वाट पहावी लागणाऱ्या कामगारांंना माध्यान भोजन योजनेंतर्गत जेवणही देण्यात येत असते.
कोरोना आपत्तीमुळे काम सोडून बायको-मुलांसह आपल्या गावी परतणाऱ्या कामगारांना यामधून माहिती देण्यासह आवश्यक ती सर्व मदत करण्यात येते. त्यात मुलांना बिस्किटे, पाण्याच्या बाटल्याही देण्यात येतात. पुण्यातून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जाणाऱ्या मजुरांची संख्या बरीच आहे. अन्य स्थानकांमध्येही काही प्रमाणात मजुरांचे स्थलांतर सुरू आहे.
--
आताच्या निर्बंधात उद्योग तसेच बांधकाम, मोठे प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे स्थलांतरित कामगारांची संख्या कमी आहे. काम सोडून जाऊ नका, असेच आमचे आवाहन आहे. मात्र, जाताना कोणाची अडचण होऊ नये यासाठी हे कक्ष सुरू केले आहेत.
- शैलेंद्र पोळ, अतिरिक्त कामगार आयुक्त, पुणे विभाग
फोटो ओळ : कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने पुणे रेल्वे स्थानकात स्थलांतरित मजुरांसाठी सहायता कक्ष सुरू करण्यात आला आहे.