पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याने सध्या कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी़. एस़ कुलकर्णी (डीएसके) यांच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना सरकारने जारी केली आहे़ त्यामुळे त्यांना आता मालमत्तांची विक्री करता येणार नाही. अधिसूचनेत १२४ ठिकाणच्या जागा, विविध कंपन्यांच्या नावावरील तसेच वैयक्तिक अशी २७६ बँक खाती तसेच ४६ दुचाकी व चार चाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत़ डीएसकेंच्या पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष तसेच कंपन्यांच्या नावावर जागा, बँक खाती आणि वाहने आहेत़ ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी हा मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे़मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे यांनी मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार करून सुमारे ३ महिन्यांपूर्वी सरकारकडे पाठविला होता़ पुढील महिन्यात शपथपत्र दाखल केल्यानंतर न्यायालय नोटिस काढून हरकती मागवेल़ त्यांना आवश्यक वाटले तर त्याची सुनावणी घेतली जाईल़ विशेष न्यायालयाने निर्णय दिल्यावर मालमत्तांचे मूल्यांकन निश्चित करून लिलाव प्रक्रिया सुरू होईल़, अशी माहिती भागडे यांनी दिली. आमच्याकडून न्यायालयात शपथपत्र दाखल झाल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया न्यायालयाच्या देखरेखीखाली होणार आहे़ त्यामुळे त्यास किती वेळ लागेल, हे आता सांगता येणार नसल्याचे भागडे म्हणाले. आता अधिसूचना निघाल्याने डीएसकेंना मालमत्तेची विक्री करता येणार नाही, असे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी सांगितले.
डीएसकेंना विकता येणार नाही मालमत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 4:40 AM