नवी दिल्ली : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना शनिवारी पहाटे दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून त्यांना दिल्लीहून पुण्याला आणले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. गुंतवणूकदारांची 230 कोटींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेपासून दिलेले संरक्षण शुक्रवारी उच्च न्यायालयाने काढून घेतल्याने डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक करण्यात येणार होती. त्यांच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी चार पथके राज्याबाहेर रवाना केली होती. अखेर आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दिल्लीतून डीएसके यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याचबरोबर त्यांना आज पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. डीएसकेंनी ते मान्यही केले. हे पैसे भरण्यासाठी उच्च न्यायालयाने डीएसकेंना अनेकदा मुदतवाढही दिली. तरीही काहीना काही बहाणा करून डीएसके वेळ मारुन नेत होते. डीएसकेंनी न्यायालयाला गृहित धरले. त्यांनी गुंतवणूकदारांसह न्यायालयाची फसवणूक व विश्वासघात केला. त्यांना अटकेपासून संरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे न्या. साधना जाधव यांनी संतप्त होत म्हटले.गुंतवणूकदारांचा माझ्यावर विश्वास आहे, हे बाहेर तुम्ही कोणत्या तोंडाने सांगता? न्यायालयाचाही तुमच्यावर विश्वास नाही. तुम्हाला न्यायालयात बोलावले, तेव्हाच अटकेचा आदेश दिला असता. मात्र, गुंतवणूकदारांचे हित साधण्यासाठी मी पैसे भरण्यासाठी संधी दिली. मात्र, तुम्ही केवळ बनाव करून वेळकाढूपणा करत आहात, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने डीएसकेंना फटकारले होते.
- बुलडाणा अर्बन पतपेढी १०० कोटींचे कर्ज देणार असल्याचे डीएसकेंनी सांगितले होते. मात्र, ते ज्या जमिनी बँकेला विकून पैसा उभा करणार होते, त्या याआधीच बँक आॅफ महाराष्ट्रकडे तारण ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुणे ईओडब्ल्यूने १५ फेब्रुवारी रोजी न्या. जाधव यांना २२ फेब्रुवारीची सुनावणी शुक्रवारी घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती.