पुणे : पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या मालमत्तांची यादी महसूल विभागाकडे दिल्यानंतर आता या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यासंबंधीचे २ प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ त्याचे नोटिफिकेशन येत्या ३ ते ४ दिवसांत निघण्याची शक्यता आहे़
डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरोधात ठेवीदारांनी तक्रारी केल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी डीएसके यांनी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धावाधाव केली़ न्यायालयाने त्यांना ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यासाठी वेळोवेळी मुदत वाढवून दिली़ प्रत्येक वेळी त्यांनी आपली मालमत्ता विकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले़.
सुभाष भागडे यांनी सांगितले, की डी़ एस़ कुलकर्णी यांच्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी २ प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ एका प्रस्तावात १७१ मालमत्ता आणि दुसºया प्रस्तावात २४ मालमत्तांचा समावेश आहे़ यामध्ये रिकामे प्लॉट, इमारती, फ्लॅट यांचा समावेश आहे़ हे प्रस्ताव मंगळवारी गृह खात्याला सादर करण्यात आले़ त्यात त्यांनी काही शंका व्यक्त केल्या़ त्यांचे निरसन करून दोन दिवसांत हे प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात येईल़ त्यानंतर लगेच गृह विभागामार्फत नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे़ त्यानंतर या जागांचे मूल्यांकन निश्चित केले जाईल़ न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा लिलाव जाहीर केला आहे़ डी़ एस़ कुलकर्णी यांच्या या मालमत्तांवर वेगवेगळ्या बँकांचे कर्ज आहे़ त्याबाबत बँका आपला हक्क न्यायालयापुढे सादर करू शकतील़ न्यायालय जो निर्णय देईल़, त्यानुसार पुढे कारवाई केली जाणार असल्याचे भागडे यांनी सांगितले़आर्थिक गुन्हे शाखेकडून यादी जिल्हाधिका-यांकडेआर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांच्या विविध कार्यालयांवर छापा घालून त्यांच्या सर्व मालमत्तांची माहिती जमा केली़ तसेच, बँक खातीही गोठविली आहेत़ त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करून त्यातून येणारी रक्कम न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ठेवीदारांना परत केली जाईल़ आर्थिक गुन्हे शाखेने मालमत्तांची यादी करून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाºयांना सादर केली़ जिल्हाधिकाºयांनी यासाठी मावळचे विभागीय अधिकारी सुभाष भागडे यांची नियुक्ती केली आहे़