नम्रता फडणीस- पुणे : महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे पुण्यात ‘प्रायोगिक रंगमंच’ उभारण्यात येणार असून, हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या आवारातील संस्थेच्या ‘रंगदर्शन सभागृहा’चेच रंगमंचात रूपांतर केले जाणार आहे. ‘दुबे प्रायोगिक रंगमंच’ असे त्याचे नामकरण देखील होणार आहे. संपूर्ण सभागृह बांधून तयार असले तरी त्याचे रंगमंचामध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक सोयीसुविधांची आवश्यकता आहे. त्यासाठी संस्थेला तब्बल दीड कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे हा निधी मिळण्यासाठी संस्थेने शासनदरबारी प्रस्ताव सादर केला आहे. आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठी अनेक कलाकारांनी आयुष्य समर्पित केले. तरूण पिढी ही प्रायोगिक चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. वेगळे विषय, नेपथ्य, साऊंड आदी माध्यमातून तरूणाई रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करीत आहे. मात्र शासनदरबारी अद्यापही प्रायोगिकला स्वत:चा हक्काचा रंगमंच उपलब्ध होऊ शकलेला नाही. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सुदर्शन रंगमंच येथेच कलाकार मंडळी प्रयोगांचे सादरीकरण करीत आहेत. मात्र आता हा छोटेखानी रंगमंच देखील अपुरा पडू लागला आहे, याच जाणीवेतून महाराष्ट्र कल्चरल सेंटरने ज्योत्सना भोळे सभागृहाच्या आवारातील पहिल्या मजल्यावरील स्वत:च्या ‘रंगदर्शन सभागृह’ येथेच प्रायोगिक रंगमंच उभारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सेंटरच्या प्रमुख शुभांगी दामले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.त्या म्हणाल्या, सध्या पुण्यात प्रायोगिक रंगभूमी चळवळ जोरात सुरू आहे. तरूणाई मोठ्या प्रमाणावर रंगभूमीकडे वळत आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रायोगिक रंगमंच उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. मात्र त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. आजमितीला प्रायोगिक नाटकांसाठी सुदर्शन रंगमंच उपलब्ध असला तरीही एकांकिकांच्या सादरीकरणासाठी हा रंगमंच अपुरा आहे. त्यामुळे संस्थेच्या ‘रंगदर्शन सभागृहा’चेच रंगमंचामध्ये आम्ही रूपांतर करणार आहोत. यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे थिएटर उभारावे लागणार आहे. खुर्च्या, सेट, वातानुकूलित यंत्रणा या गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यासाठी दीड कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. संस्थेने निधीच्या उपलब्धतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. शासनाकडून निधी न मिळाल्यास मुंबईमधून देणगी स्वरूपात किंवा सीएसआर उपक्रमांमधून आम्ही निधी उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.-----------------------------------------------
महाराष्ट्र कल्चरल सेंटर उभारणार ‘दुबे प्रायोगिक रंगमंच’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 1:59 PM
सध्या पुण्यात प्रायोगिक रंगभूमी चळवळ जोरात सुरू
ठळक मुद्दे निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर; संस्थेला तब्बल दीड कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित कलागुणांना वाव देण्यासाठी प्रायोगिक रंगमंच उपलब्ध होणे ही काळाची गरज खुर्च्या, सेट, वातानुकूलित यंत्रणा या गोष्टी कराव्या लागणारप्रायोगिक रंगभूमीसाठी अनेक कलाकारांनी आयुष्य समर्पित