पुणे : खडकवासला धरणातून शनिवारी दिवसभर मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शहर आणि धरणक्षेत्रात फारसा पाऊस नसतानाही मुठा नदी दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र शनिवारी (दि.४) पाहायला मिळाले. पानशेत धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सायंकाळी खडकवासला धरणातील विसर्ग अडीच हजारांवरून पावणेसात हजार क्युसेकपर्यंत वाढविला.खडकवासला प्रकल्पातील पानशेत धरण क्षेत्रात शनिवारी दिवसभरात ५, वरसगाव ६ आणि टेमघर धरण क्षेत्रात २० मिलिमीटर पाऊस झाला. शनिवारी सकाळी आठ पूर्वीच्या २४ तासांत टेमघर ३१, वरसगाव आणि पानशेतला प्रत्येकी १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणात १.९७, पानशेत १०.६५ (दोन्ही १०० टक्के), वरसगाव १०.५२ (८२.०५ टक्के) आणि टेमघर धरणात २.२९ (६१.६८ टक्के) अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांत मिळून २५.४३ टीएमसी (८७.२३ टक्के) पाणीसाठा आहे. गुंजवणी धरण क्षेत्रात ४ आणि नीरा देवघर धरण परिसरात ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुंजवणीत २.२९ (६२.०२ टक्के), नीरा देवघर १०.४४ (८९.०३ टक्के), भाटघर २०.८६ (८८.७८ टक्के) आणि वीर धरण क्षेत्रात ८.४७ (९०.०६ टक्के), मुळशी १६.७५ (९०.७७ टक्के), पवना ८.४४ (९९.१५ टक्के) आणि माणिकडोह धरणात ४.३२ (४२.४३ टक्के) टीएमसी पाणी साठा आहे.। ९ हजार क्युसेक विसर्गखडकवासला आणि पानशेत धरण १०० टक्के भरले असल्याने या दोन्ही धरणांतून दिवसभर नदीत पाणी सोडण्यात येत होते. शनिवारी सकाळी आठ वाजता पानशेत धरणातून १ हजार ९५४ आणि खडकवासला धरणातून २ हजार ५६८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. सायंकाळी पाचपर्यंत खडकवासला धरणातून ६ हजार ८५४ आणि पानशेत धरणातून नदीत १ हजार ४५५ आणि कालव्याद्वारे ९९० क्युसेक पाणी सोडण्यात आले.
पाऊस नसतानाही मुठा वाहिली दुथडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 12:38 AM