पुणे : गरवारे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या परवानगीशिवाय संविधान दिनाचा कार्यक्रम घेतल्याने १८ विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी नोटिसा बजावल्या. याविरोधात विविध विद्यार्थी संघटनांकडून प्राचार्य मुक्तजा मठकरी यांना मंगळवारी घेराव घातला. या पार्श्वभूमीवर संविधान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा खुलासा मुक्तजा मठकरी यांनी केला आहे.गरवारे महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे परवानगी मागितली होती. मात्र हा कार्यक्रम घेण्यासाठी महाविद्यालयाने परवानगी दिली नाही. त्यामुळे त्यांनी परवानगीशिवाय संविधान दिनाचा कार्यक्रम घेऊन सरनाम्याचे वाचन केले होते. त्यामुळे परवानगीशिवाय कार्यक्रम घेतलाच कसा, याच्या नोटिसा विद्यार्थ्यांना बजावल्या होत्या. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मंगळवारी प्राचार्यांना घेराव घालून निषेध व्यक्त केला. संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यास मज्जाव घालणे हे अतिशय धक्कादायक आहे. या वेळी युवा सेनेचे किरण साळी, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, जेडीयूचे कुलदीप आंबेकर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या नियमानुसार परवानगी घेऊनच कार्यक्रम करावेत, असे स्पष्ट करीत दिलगिरी व्यक्त करून प्राचार्या मुक्तजा मठकरी यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
संविधान दिन कार्यक्रम घेतल्याने नोटिसा, गरवारे महाविद्यालय, विद्यार्थी संघटनांकडून प्राचार्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 3:59 AM