पुणे : वानवडीतील महाविकास आघाडीच्या वतीने संविधान चौकात 'संविधानाच्या' प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन (Maharashtra Bandha) च्या रॅलीला सुरुवात झाली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून वानवडी पोलीसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आझादनगर, साळुंखे विहार, केदारीनगर, शिवरकर रस्त्यावरुन काढण्यात आलेल्या या दुचाकी रॅलीत, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेने पदाधिकारी कार्यकर्ते हे रस्त्यांवरील अत्यावश्यक सेवेतील व इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते.
पुढे ही रॅली मुख्य सोलापूर रस्त्यावरील फातिमानगर चौकात आल्याने सोलापूर रस्त्यावरील वाहतूक खोळंबून रस्ता जाम झाला. रँलीत तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते गटागटांनी सहभागी झाले होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर रॅलीत सहभागी झाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक शिवाजी केदारी, अभिजित शिवरकर, साहिल केदारी आणि कार्यकर्ते यांच्या मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजीत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. काही वेळानंतर वानवडीतील जनजीवन पुर्वपदावर आल्याचे पहायला मिळाले.
''लखीमपुर (lakhimpur) येथे घडलेली घटना निंदनीय असून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तेथे घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद करुन महाराष्ट्रातील व्यापारी, व्यावसायिकांना वेठिस धरणे चुकीचे वाटते. वानवडीमध्ये व्यापारी असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र बंद ला पाठिंबा नाही. परंतु दडपशाहीमुळे व्यापारीवर्गांनी आपली दुकाने बंद ठेवली होती असे वानवडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश पुंडे यांनी सांगितले.''