कोरेगाव भीमा : कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील भारतीय स्टेट बँक फोडण्याचा गुरुवार (दि. २८ ) रोजी रात्री दिडच्या सुमारास चोरट्यांनी प्रयत्न केला होता मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच पोलीस प्रशासनाला बोलविल्यानंतर चोरीचा प्रयत्न फसला असून यापूर्वीही ३१ जानेवारी २०१५ रोजी बँक फोडण्याचा प्रयत्न फसला. मात्र बँक प्रशासन बँकेच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न करीत नाही.सर्वच बँकेच्या सुरक्षीततेबाबत बँक अधिकारी व बँक प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोरेगाव भीमा येथील बँकेच्या पूर्व बाजुकडील भिंतीजवळ काही चोरट्यांनी प्रवेश करुन भिंत फोडण्यास सुरुवात केली. जवळच असलेल्या फ्लेक्स दुकानामध्ये प्रींटिंगचे काम चालु असताना हरिष चव्हाण व इतर तरुणांना बँकेजवळ मोठ्याने आवाज येत असल्याचे जाणवले. त्यांनी विक्रम दौंडकर यांना कल्पना दिली. त्यानंतर हरिष चव्हाण यांनी त्यांच्या चारचाकी वाहनाची लाईट बँकेच्या बाजूकडे केली असता त्यांना एक चोरटा बँकेची भिंत फोडत असल्याचे पाहिले. दरम्यान विक्रम दौंडकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेली बीट मार्शल वाहन त्या ठिकाणी तातडीने दाखल झाले. पोलीस उपनिरिक्षक गणेश वारुळे यांनी परिसरात नाकाबंदी करुन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे भारतीय स्टेट बँक तसेच या बँकेचे एटीएम असून या बँकेमध्ये ३१ जानेवारी २०१५ मध्ये चोरट्यांनी बँकेच्या आतमध्ये प्रवेश करून बँकेच्या स्ट्राँगरुममध्ये प्रवेश केला होता, परंतु अचानक सायरन वाजू लागल्याने चोरटे पळून गेले . तर मागील महिन्यात ४ आॅगस्ट २०१७ रोजी देखील चोरट्यांनी स्टेट बँकेच्या एटीएम मशीन बाहेरील लॉक तोडून आतमध्ये प्रवेश करत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यावेळी नागरिक आल्याची चाहुल लागल्याने चोरटे पळून गेले होते. मात्र त्यांनतर अवघ्या काही दिवसातच चोरट्यांनी शिक्रापूर येथील स्टेट बँकेचे एटीएम पंधरा लाख रुपयांसह २३ आॅगस्ट रोजी चोरून नेले असल्याची घटना घडली. त्यांनतर पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एटीएम मशीन चोरणाºया चोरट्यांना अटक केली असता त्यांनी कोरेगाव भिमा येथे देखील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबुल केले होते.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोरेगाव भिमात स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 5:30 PM
कोरेगाव भिमा येथील भारतीय स्टेट बँक फोडण्याचा गुरुवार (दि. २८ ) रोजी रात्री दिडच्या सुमारास चोरट्यांनी प्रयत्न केला होता, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच पोलीस प्रशासनाला बोलविल्यानंतर चोरीचा प्रयत्न फसला.
ठळक मुद्देसर्वच बँकेच्या सुरक्षीततेबाबत बँक अधिकारी व बँक प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.या बँकेमध्ये ३१ जानेवारी २०१५ मध्ये चोरट्यांनी बँकेच्या आतमध्ये प्रवेश करून बँकेच्या स्ट्राँगरुममध्ये प्रवेश केला होता.मागील महिन्यात ४ आॅगस्ट २०१७ रोजी देखील चोरट्यांनी स्टेट बँकेच्या एटीएम मशीन बाहेरील लॉक तोडून आतमध्ये प्रवेश करत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.