जुन्नर : राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार दास यांच्या सतर्कतेने रोजगारासाठी जुन्नर तालुक्यातील नगदवाडी येथे आलेल्या कुटुंबातील दोन मुलांना जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी व सहकारी यांच्या शोधमोहिमेतून तातडीने जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांचे अर्धवट थांबणारे शिक्षण पुढे सुरळीत सुरू झाले आहे.रोजगारासाठी आई-वडिलांच्या मागे फिरणारी ही मुले शाळाबाह्य राहू नयेत, त्यांचे शालेय शिक्षण खंडित होऊ नये, म्हणून प्रधान सचिव नंदकुमार यांनी दाखविलेली तत्परता सर्व शिक्षा अभियानास पाठबळ देणारी ठरली आहे. आदित्य आर्सुड व प्राची आर्सुड अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील बाजार बाहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत हे विद्यार्थी शिकत होते. रोजगाराच्या शोधात त्यांचे वडील विलास आर्सुड पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आले होते. याबाबत घडलेली घटना अशी : शनिवारी (दि. २५) शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव जालना येथे शिक्षण विभागाच्या बालरक्षक संवाद सभेच्या बैठकीत असताना त्यांना तेथील एक कुटुंब रोजगाराच्यानिमित्ताने शाळेत शिकणाºया दोन मुलांसह जुन्नर तालुक्यात आळेफाटा परिसरात स्थलांतरित झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी या मुलांचे शालेय नुकसान होऊ नये, म्हणून लगेचच राज्य समन्वयक सिद्धेश वाडकर यांना सूचना केल्या. वाडकर यांनी त्याच दिवशी दुपारी २ वाजता जुन्नरचे गटविकास अधिकारी के. डी. भुजबळ यांना पालक आणि मुलांची माहिती दिली. भुजबळ यांनी आळेफाटा शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण यांच्यासमवेत जाऊन या कुटुंबाचा शोध सुरू केला. आळेफाटा परिसरात कुटुंब काही मिळून आले नाही. अखेर पालकांचा संपर्क क्रमांक मिळाल्यानंतर जवळच असलेल्या नगदवाडीत संध्याकाळी या कुटुंबीयांचा शोध लागला. येथील एका फार्महाऊसवर रोजगारासाठी हे कुटुंब आले होते. सोमवारी (दि. २७) सकाळी या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे नगदवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्यात आली.२१ स्थलांतरित मुलांचा प्रश्न...जालना येथील बालरक्षकांच्या बैठकीत बाजार बाहेगाव येथील २१ स्थलांतरित मुलांचा प्रश्न चर्चेत आला. यातील १० मुलांची व्यवस्था मुख्याध्यापक शिवाजी डाके यांच्या माध्यमातून मुलांच्या नातलगांकडे करण्यात आली, यातील ९ मुलांना स्थलांतरित ठिकाणी शाळेत दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली. यातील आदित्य आर्सुड, प्राची आर्सुड व पालकांचा शोध लागत नव्हता. या मुलांचा काकांशी संपर्क झाल्यावर ही मुले जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे असल्याचे समजले. परंतु पालकांशी फोनवरून संपर्क होत नसल्याने प्रयत्न सोडून देण्याचे मानसिकतेत असताना प्रधान सचिव नंदकुमार यांच्या माध्यमातून ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणली गेली.
सचिवांच्या सतर्कतेमुळे ‘त्यां’चे शिक्षण सुरळीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 2:30 AM