पिंपरी : नोटाबंदीमुळे व्यवसाय निम्म्यावर आला असल्याची माहिती शहरातील हॉटेल व बार व्यावसायिकांनी दिली.दररोज लाखोंच्या घरात या हॉटेल व्यावसायिकांची उलाढाल होत असते.बहुतांश हॉटेलमध्ये पैैसे देण्यासाठी डेबीट व क्रेडीट कार्डचीदेखील सोय असून, रोखीने व्यवहारदेखील होतात. मात्र, बोटावर मोजण्याइतकेच ग्राहक या कार्डचा वापर करतात. बहुतांश ग्राहक रोखीनेच व्यवहार करतात. परंतू आठवडाभरापासून हजार व पाचशेच्या नोटा चलनातुन बाद झाल्याने, ग्राहकांचेदेखील हॉटेलकडे फिरकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. व्यावहारातुन बाद झालेल्या नोटा ग्राहकांकडून आम्ही कशा घेणार असा प्रश्न उपस्थित करुन आमच्या व्यावसायावर मोठ्या परिणाम झाला असल्याचे हॉटेल व्यावसायिक निलेश काटे, नंदकुमार काटे, व भरत काटे यांनी सांगितले. तसेच व्यावसाय थंडावल्यामुळे पुढील महिन्यांत कामगारांचा पगार कसा करायचा, असा प्रश्नही या व्यावसायिकांनी उपस्थित केला.परमीट बार व्यवसायांवरही मोठा परिणाम झाला असून, आठवडाभरापासून व्यवसाय पन्नास टक्क्यांवर आला आहे. नोटाबंदीमुळे बीलांचे पैसे व कामगाराचे वेतन द्यायलाही अडचण निर्माण झाली असल्याचे एका परमीट बार मालकाने सांगितले. (प्रतिनिधी)
नोटबंदीमुळे हॉटेल व्यवसाय निम्म्यावर
By admin | Published: November 17, 2016 3:11 AM