ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १८ - भाजपच्या विरोधामुळे पुण्याच्या कोथरुडमधील सिटी प्राईड चित्रपटगृहातील 'बाजीराव-मस्तानी' या बहुचर्चित चित्रपटाचे सर्व खेळ रद्द करण्यात आले आहेत. 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटाविरोधात पुणे भाजपने आंदोलनाचा इशारा दिला होता. भाजपच्या विरोधामुळे चित्रपटगृहाच्या मालकांनी चित्रपटाचे शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. सिटी प्राईडमध्ये बाजीराव-मस्तानीचे एकूण तीन शो होणार होते. त्यात पहिला शो सकाळी आठ वाजता होता.
बाजीराव-मस्तानी चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करु नये असा इशारा भाजपने दिला होता. चित्रपटगृहाची नुकसानी टाळण्यासाठी सिटी प्राईडप्रमाणे पुण्यातील आणखी काही चित्रपटगृहातून या चित्रपटाचे सकाळचे शो रद्द केले जाण्याची शक्यता आहे. सिटी प्राईड चित्रपटगृहाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. हा चित्रपट प्रदर्शित होणा-या पुण्यातील अन्य चित्रपटगृहाबाहेरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
या चित्रपटात बाजीराव यांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना पिंगा या गाण्यावर तसेच खुद्द बाजीरावांना सैनिकांसोबत नाचताना दाखवल्याने अनेकांच्या मनात संतापाची भावना आहे. वास्तवात असे कधी घडलेच नसल्याचे इतिहासतज्ञ सांगतात. मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी काशीबाई आणि मस्तानी तसेच बाजीरावांच्या नृत्याचे समर्थन केले आहे.