वेल्हे : वर्षानुवर्षे डोंगरदऱ्यात अवघड क्षेत्रात काम केले. प्रतिकूल परिस्थिती, जंगलवाटा, हिंस्र श्वापदे यांचा सामना करीत सेवा बजावली. चार महिने मुसळधार पाऊस, दुर्गम डोंगरातील कडेकपारीतून दोन-दोन तास चालत जाऊन ज्ञानदानाचे काम केले. कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावले आशा शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. आॅनलाईन बदल्या होणारच असून या दुर्गम भागातील शिक्षकांना आता कुटुंबियांजवळ जाण्याची संधी मिळणार आहे.जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदली धोरणावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असून आता शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी जाहीर केल्यानंतर या दुर्गम भागातील शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.भोर, मुळशी, मावळ, आंबेगाव व जुन्नर या सहा दुर्गम तालुक्यांतील शिक्षक अनेक वर्षे या बदलीची वाट पाहत होते. यावर्षी त्यांना संधी आली मात्र सोप्या क्षेत्रावरील शिक्षकनेते ही बदली प्रक्रिया बंद पाडण्यासाठी एकवटल्याने ते चिंतेत होते. वारंवार मागणी करूनही या अवघड भागातील शिक्षकांना अनेक वर्षांपासून बदलीमधून डावलण्यात आले होते. आता दुर्गम शिक्षकांबरोबरच अपंग शिक्षक, दुर्धर आजारी, मतिमंद पाल्यांचे पालक असणारे शिक्षक तसेच विधवा, परित्यक्ता शिक्षिका यांना सोयीचे ठिकाण निवडण्याची संधी मिळणार आहे. बदल्यांचा लपंडावाचा खेळ अखेरीस संपला. मागील वर्षीपासून संपूर्ण राज्यभर शिक्षकबदली प्रक्रियेचे घोंगडे भिजत पडले होते. सुगम- विरुद्ध दुर्गम असा वाद निर्माण झाला. २७ फेब्रुवारी २०१७ च्या धोरणानुसार दुर्गम भागात जावे लागण्याच्या भीतीमुळे स्वत: चे बस्तान बसवलेल्या सुगम भागातील शिक्षकांनी एकत्र येऊन प्रचंड विरोध केला. येनकेन प्रकारे ही बदली प्रक्रिया बंद पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करत या धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दुर्गम शिक्षकांचा गांभीर्याने विचार करुन याच शासननिर्णयानुसार बदली प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. आणि अखेरीस दुर्गम शिक्षकांच्या लढ्याला यश आले. शिवाय बदली प्रश्नावर सुगम शिक्षकांंनी यापुढे याचिका दाखल करु नये असेही निकालात खडसावले होते. मात्र, राजकीय पातळीवरुन व मोर्चे काढून बदलीला विरोध चालू होता. आज ग्रामविकासमंत्र्यांच्या घोषणेमुळे सर्व प्रश्न मिटले आहेत.सध्या ही बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शिक्षक बदली लपंडावाचा खेळ संपला असल्याचे दिसत आहे.
दुर्गम बदली अधिकारप्राप्त शिक्षक- १५००सुगम बदलीप्राप्त शिक्षक- ५०००आपंग, दुर्धर आजारी, विधवा, परित्यक्ता- ७००पती-पत्नी एकत्रीकरण - १५००.............................या लढ्याला यश आले असल्याने आनंद २७ फेब्रुवारी २०१७ चा शासनआदेश हा क्रांतिकारक आहे. यामध्ये केवळ दुर्गम शिक्षकांचा विचार केला नसून उपेक्षित, दुर्लक्षित, अपंग, दुर्धर आजारी, वेगवेगळ्या ठिकाणी दूरवर काम करणारे शिक्षक पती- पत्नी या घटकांनाही यामुळे न्याय मिळाला आहे. वर्षानुवर्षे जे लोकं घराबाहेर आणि कुटुंबापासून दूर आहे, त्यांच्या जीवनामध्ये या बदलीतून आनंद निर्माण झाला आहे. दुर्गम शिक्षकांच्या व्यथा मांडण्यासाठी माझ्यासोबत महाराष्ट्रातील सर्व दुर्गम शिक्षकांनी एकत्र येऊन आपले ज्वलंत प्रश्न शासनदरबारी मांडले. आज या लढ्याला यश आले असल्याने आनंद वाटत आहे. - राहूल शिंदे, भोर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दुर्गम शिक्षक संघटना.
...................................
६ महिन्याच्या बाळाशी दोन दिवस ताटातूटवेल्हे तालुक्यातील तोरणागडाच्या पश्चिमेकडील अतिदुर्गम कोकणकड्यावरील एका गावात ७ वर्षे शिक्षिका म्हणून सेवा केली. ना मोबाईल.. ना वाहतुकीची सोय..धोकादायक डोंगरकपारीतील रस्त्याने प्रवास केला. कधी कधी लहान बाळाला घेऊन शाळा केली. पावसाळ्यात पाणी झिरपणाऱ्या भिंती..सोसाट्याचा वारा अशा प्रतिकूल स्थितीत दिवस काढले. एकदा पावसाळ्यात दरडी कोसळल्याने केळद घाटातून रस्ता बंद झाल्यावर शाळेच्या गावात मुक्काम पडल्यामुळे माझ्या ६ महिन्याच्या बाळाशी दोन दिवस ताटातूट झाली. पण या बदलीमुळे आता आम्हांला सुगम ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळत आहे. - मिनाज सय्यद , दुर्गम शिक्षिका, वेल्हे.............................या धोरणाने अपंग, पती- पत्नी शिक्षक आणि डोंगराळ व दुर्गम भागातील शिक्षकाना खरा न्याय मिळाला आहे. आज पर्यंत काही पुढारलेले लोक सेटलमेंट करून आपल्या सोईच्या शाळा घेत असत, त्याला आता पूर्णपणे अटकाव झाला आह. या धोरनाला काही लोकांनी विरोध केला पण दुर्गम भागत प्रत्येकाने नको म्हटले तर कसे चालणार..? मला जर १० वर्षांनंतर पुन्हा दुर्गम भागात यावे लागले तर आनंदाने हसत हसत येईल. - संतोष कोष्टी, दुर्गम शिक्षक, वेल्हे ....................