खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात सध्या उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू आहे. बाजारात कांदा, बटाटा तसेच भाजीपाला शेतीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतो. भाजीपाल्याचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समाविष्ट केला असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. परंतु, पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व प्रकारचे व्यवहार बंद राहतील असे सांगितल्याने शनिवारी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेला भाजीपाला, कांदा व बटाटा हा शेतीमाल पडून राहिला.
शेतीमालाला जीवनावश्यक वस्तूंमध्ये सामील केल्याने बाजार समितीच्या वतीने चाकण बाजार आठवडे सुट्टी ( सोमवार ) सोडून शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन जरी असले तरी नेहमी प्रमाणे सुरू राहतील असे स्पष्ट करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. परंतु खरेदीदारच आले नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीमाल परत नेला तर काहींनी तो जागेवर सोडून दिला. तसेच कांदा-बटाटा मार्केटमध्ये तब्बल दहा ट्रक बटाटा बाहेरील राज्यातून विक्रीसाठी आला होता.परंतु तो माल लिलाव बंद असल्याने तीन दिवस ट्रकमध्येच पडल्याने बटाटा खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनने गोरगरीब शेतकऱ्यांचे चाकण मार्केट बंद असल्याने जवळपास दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने निदान शेतीमाल विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.