पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला आहे. येथील भुसार बाजारात संपूर्ण देशातून बासमती व अन्य तांदळाची आवक सुरू झाली आहे. केंद्र शासनाने मूलभूत आधार किमतीमध्ये वाढ केल्याने सर्व प्रकारच्या तांदळाच्या दरामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.यंदा देशात महाराष्ट्र वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. यामुळे तांदळाच्या एकूण उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली आहे. यामुळे येथील मार्केट यार्डमध्ये तांदळाची आवकदेखील वेळेत सुरू झाली आहे. पुण्यात प्रामुख्याने गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाना, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब या भागातून तांदळाची आवक होते. सध्या गुजरात येथून कोलम, लचकारी कोलम, मध्य प्रदेश येथून कोलम, चिन्नौर, कालीमुच, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेश येथून ११२१ बासमती, सर्व प्रकारचा तुकडा बासमती, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून सोनामसुरी, कोलमची आवकची आवक सुरू झाली आहे. पंजाब येथून अद्याप पारंपरिक बासमतीची आवक सुरू झालेली नसून, पुढील आठवड्यात ती सुरू होईल. त्याबरोबरच मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथून आंबेमोहरची आवक काही दिवसात सुरू होईल.राज्यातील दुष्काळाचा इंद्रायणीला फटकाराज्यात यंदा दुष्काळ पडला असून, परतीच्या पावसाने सर्वच भागात पाठ फिरवली. याचा मोठा फटका स्थानिक इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनाला बसला आहे. इंद्रायणी तांदळाला स्थानिक भागातून प्रामुख्याने घरगुती ग्राहकांकडून चांगली मागणी असते. नागपूरसह विविध इंद्रायणी उत्पादक भागात उत्पादन घटले आहे. त्यामुळे इंद्रायणीचा हंगाम सुरू झाला असला, तरीही नेहमीच्या तुलनेत कमी आवक होत असल्याचेही राजेश शहा यांनी सांगितले.हमीभावामुळे दरवाढकेंद्र शासनाने तांदळाच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. यामुळे तांदळाच्या किमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मात्र यंदा शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले आहेत. तांदळाचे उत्पन्न व आवकदेखील चांगली आहे.
हमीभावामुळे तांदळाच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 1:30 AM