डीजे बंदीबाबत संभ्रम कायम, साऊंड सिस्टीमवाल्यांना परवानगी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 02:34 AM2018-09-23T02:34:21+5:302018-09-23T02:34:39+5:30
विसर्जन मिरवणुकीत डीजेला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, पोलिसांकडून मंडळांना ध्वनिमर्यादा पाळून स्पीकर, मिक्सर लावण्यास परवानगी दिली जात आहे.
पुणे - विसर्जन मिरवणुकीत डीजेला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, पोलिसांकडून मंडळांना ध्वनिमर्यादा पाळून स्पीकर,
मिक्सर लावण्यास परवानगी दिली जात आहे. तर, काही साऊंड सिस्टीमवाल्यांना मात्र बंदीचे कारण दाखवून परवानगी नाकारली जात असल्याने ‘डीजे’बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे रविवारी मिरवणुकीदरम्यान मंडळे कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये साऊंड सिस्टीमचा वापर करण्याबाबत दि. १३ सप्टेंबर रोजीच्या प्रतिबंधात्मक आदेशात निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये मिरवणुकीत डीजेचा वापर कोणतेही मंडळ करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. पण, स्पीकर व मिक्सरला परवानगी दिली असली तरी त्यांना आवाजाची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
डीजे असोसिएशनचे सहसचिव सुनील ओहाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने दोन बेस आणि दोन टॉप साऊंड लावण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ते लावायचे की नाही,
याबाबत संभ्रम आहे. पोलिसांकडून काही मंडळांना अशा परवानग्या
दिल्या आहेत, तर साऊंड सिस्टीमवाल्यांना परवानग्या नाकारल्या जात आहेत.
शनिवारीही काही भागात डीजेवर मिरवणुका सुरू होत्या. काही मंडळांना दोन-चार बेस लावण्याच्या परवानग्या दिल्या आहेत; पण साऊंडवाल्यांना स्पीकर किंवा मिक्सर लावायलाही मान्यता मिळालेली नाही.
याबाबत मंडळांमध्येही संभ्रम असल्याने अनेक मंडळांनी बुकिंग रद्द केले आहे. काहीच स्पष्टता नसल्याने गोंधळाची स्थिती असल्याचे ओहाळ यांनी सांगितले.
डीजे बंदीविरोधात गणेश मंडळे आक्रमक
न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्याने राज्यातील गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण आहे. या निर्णयाविरोधात पुण्यातील गणेश मंडळे आणि डीजे मालकांची आज पुण्यात बैठक झाली. तीत शहरातील ९० हून अधिक गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
न्यायालयाच्या निर्णयाने गणेशोत्सव मंडळे आणि डीजे व्यावसायिकांची अडचण झाली आहे. त्यामुळे डीजेवर बंदी आणल्याने गणेशविसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता गणपतीची मूर्ती मंडपातच ठेवणार असल्याचा निर्णय शहरातील गणेश मंडळांनी घेतला आहे. शहरातील २०० मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा इशारा दिल्याचा दावा माजी नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे.
सरकार हिंदूंच्या सणांच्या विरोधात जाणीवपूर्वक या पद्धतीने निर्णय घेत असून त्याविरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचे सांगून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले, की गणेश मंडळांना निवेदने देऊन डीजे बंदीच्या निषेधात सहभागी करून घेणार आहोत.
डीजेच्या आवाजाला हरकत घेऊन त्यावर बंदी आणली आहे. मात्र, प्रत्यक्षात उत्सवात खरेच डीजेच्या आवाजाची तपासणी होते का? हा प्रश्न आहे. यापुढील काळात गणेशोत्सव साजरा करू नये, अशी वातावरणनिर्मिती सरकारकडून केली जात असल्याची टीका धनवडे यांनी केली.
गणेशोत्सव व गणेशभक्तांचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिकाराचा उपयोग करून डीजेवरील बंदी मागे घ्यावी. त्यांनी तसे न केल्यास गणपतीचे विसर्जन होऊ देणार नाही. सरकारने या निर्णयाविरोधात दाद मागण्याकरितादेखील पुरेसा अवधी दिला नाही. न्यायालसमोर बाजू मांडताना डीजे बंदीला आपले समर्थन दिले, असा आरोप मंडळांकडून होत आहे.
पोलीस व मंडळांत वाद पेटविण्याचा डाव
डीजेवरील बंदीनंतर मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात सातत्याने संघर्ष होईल, याची जाणीव सरकारला असतानादेखील त्यांनी बंदी कायम ठेवली आहे. मात्र, पोलिसांना सहकार्य तसेच शिस्तीचे पालन करण्याची भूमिका मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. शासनाने हा निर्णय मागे न भेतल्यास आगामी निवडणुकांमध्ये भाजपा पक्षाचे विसर्जन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वैभवशाली मिरवणुकीने गणेशोत्सव ची सांगता करण्यास व गणेशभक्तांची सेवा करण्यास सर्व पोलीस दल सज्ज आहे. व्हिडिओ कॅमेरे, जीपीएस सिस्टीमसह सर्व तांत्रिक सुविधांसह पोलीस सज्ज आहेत़ पोलीस कायद्याच्या कक्षेत राहून काम करतील. कार्यकर्त्यांनीही न्यायालयाचा आदेशाचे पालन करून विसर्जन मिरवणूक उत्साहात साजरा करावी.
- डॉ़ के़ व्यंकटेशम, पोलीस आयुक्त
डीजेला बंदी घालण्यात आल्यामुळे शनिवारी दिवसभर ढोल ताशा पथकांकडे गणेशमंडळांक डून चौकशी केली जात होती. यंदा डीजेला बंदी घातल्यामुळे आदल्या दिवसांंपर्यत पथकांसाठी मोठ्या प्रमाणावर विचारणा केली जात होती.
- पराग ठाकुर, अध्यक्ष ढोल ताशा महासंघ