लोकमत न्यूज नेटवर्कचंदननगर : नगररस्त्यापासून काही अंतरावर लोहगाव, खांदवेनगर येथील खासगी जागेत असणाऱ्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा सोमवारी दुपारी चारच्यादरम्यान पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांना अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले.अक्षय अरुण चिंचोलकर (वय २५, रा. रामचंद्र काळेनगर, खांदवे वस्ती, लोहगाव) आणि रवी पोपट गडसिंग (वय २६, रा. बिडी कामगार वसाहत, चंदननगर) असे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सोमवारी सुटीचा मुहूर्त साधून अक्षय चिंचोलकर, रवी गडसिंग आणि त्यांचे मित्र सुनील अर्जुन जाधव व पप्पू बबन तिहटकार हे चोघे जण खांदवेनगरला फिरण्यासाठी गेले होते.दर्गा खांदवेनगरमधील एका खासगी जागेतील शेततळ्यात (तलावात) सात ते आठ फूट पाणी साचले होते. चोघे मित्र तिथे गेल्यावर अक्षय आणि रवी यांनी पोहण्याचा बेत आखला आणि पोहण्यासाठी पाण्यात उतरले. सुनील आणि पप्पू बाहेर बसले होते. पाण्यात काही अंतरावर गेल्यावर रवी बुडत असल्याने आरडाओरडा करू लागला. त्यामुळे अक्षय रवीला वाचविण्यासाठी आला. पण रवीने अक्षयला जोरात मिठी मारल्याने दोघेही बुडू लागले. हे पाहताच सुनील दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात गेला. मात्र रवीने अक्षयला घट्ट पकडल्याने सुनील माघारी परतला.काही क्षणांतच दोघे पाण्यात बुडाले. मित्रांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक-पाटील, विलास सोंडे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही मिनिटांत अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले.पोलिसांच्या अग्निशामक दलाच्या मदतीने पाण्यातून दोघांना बाहेर काढले. त्या वेळी दोघे मृत झाले होते. त्यानंतर विच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे यांनी दिली.
शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू
By admin | Published: June 27, 2017 7:55 AM