लोणावळा : लोणावळा येथील भुशी धरणात गुरुवारी दुपारी मित्रांसोबत वर्षाविहाराकरिता आलेल्या अंबरनाथ, ठाणे येथील एक पर्यटक भुशी धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. भुशी धरणात पर्यटक बुडण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. स्थानिक जीवरक्षक, शिवदुर्ग मित्र, लोणावळा शहर पोलीस व अपघातग्रस्तांच्या मदतीला या पथकाने शोध मोहीम राबवली. आज शुक्रवारी (दि. २२जून) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सुरेंद्र तुकाराम कदम (वय २४, रा.अंबरनाथ, ठाणे) असे या मयत पर्यटकाचे नाव आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र आणि इतर तीन मित्र लोणावळा खंडाळा येथे गुरुवारी वर्षाविहार व पर्यटनासाठी आला होते. ते सर्वजण गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान भुशीडॅम येथे फिरायला गेले होते. यावेळी ते धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असताना पोहताना सुरेंद्र हा मित्रांना बराच वेळ दिसला नाही म्हणून मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो कोठेही आढळून न आल्याने मदतीसाठी आरडा ओरड केली असता भुशीडॅमजवळ असलेले व्यावसायिक व जीवरक्षक साहेबराव चव्हाण, राजू पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात उडी मारून सुरेंद्रचा शोध घेतला. परंतु, तो नक्की कोठे बुडाला याचा अंदाज नसल्याने शोध घेणे अवघड गेले. तत्पूर्वी, स्थानिकांनी या घटनेबाबत लोणावळा शहर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच शिवदुर्ग मित्र या जीवरक्षक पथकाचे राजेश तेले, आनंद गावडे, सागर कुंभार, अजय शेलार, प्रणय अंभोरे, प्रविण देशमुख, वैष्णवी भांगरे, अभिजीत बोरकर, राहुल देशमुख, विकास मावकर, अनिल आंद्रे, राजु पाटील, अनिकेत आंबेकर, दिनेश पवार,अतुल लाड, मधूर मुंगसे, प्रविण ढोकळे, अशोक उंबरे,अमोल परचंड, सागर पडवळ, निकीत तेलंगे,रोहीत वर्तक, सुनिल गायकवाड यांनी शोधमोहिमेत सहभाग घेतला. मात्र, अंधार पडल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली. आज सकाळपासून पुन्हा स्थानिक व शिवदुर्गचे कार्यकर्ते तसेच खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीला या पथकाचे कार्यकर्ते यांनी धरणात शोध मोहिम राबवत सुरेंद्र याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
भुशी धरणाच्या जलाशयात बुडून युवा पर्यटकाचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:29 PM
भुशी धरणात पर्यटक बुडण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
ठळक मुद्देलोणावळा येथील भुशी धरणात गुरुवारी दुपारी मित्रांसोबत वर्षाविहाराकरिता आलेल्या अंबरनाथ, ठाणे येथील एक पर्यटक भुशी धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.