भोर : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्र्रेसकडून तृप्ती किरवे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. छाननीत हा अर्ज वैध ठरल्याने तसेच विरोधकांकडून अर्ज दाखल न झाल्याने किरवे यांची निवड जवळपास निश्चित झाली असून, केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.भोर नगरपलिकेचे नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे यांचा नगराध्यक्षपदाचा १ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला होता. त्यामुळे नवीन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार, शुक्रवारी उमेवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून तृप्ती जगदीश किरवे यांनी मुख्याधिकारी संजय केदार यांच्याकडे अर्ज दाखल केला. या वेळी गटनेते किसन वीर, उपनगराध्य गजानन दानवले, तानाजी तारू, देविदास गायकवाड, जगदीश किरवे उपस्थित होते. भोर नगरपलिकेच्या २०१३मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी काँगे्रसला १७ पैकी १३ जागा मिळाल्या होत्या. तर, राष्ट्रवादीला ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. शिवसेना-भाजपाला खातेही उघडता आले नव्हते. नगरपलिकेचे पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. त्या वेळी पहिल्या वर्षासाठी नगराध्यक्षपदी दीपाली शेटे यांची निवड करण्यात आली होती.
भोर नगराध्यक्षपदासाठी तृप्ती किरवे निश्चित
By admin | Published: December 24, 2016 6:38 AM