पुणे : दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को-आॅपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीने पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या पदाचा गैरवापर करुन संस्थेने अपहार केल्याची खोटी तक्रार संबंधित उपनिरीक्षकाने केल्याचे संस्थेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. दरम्यान, ईसीएसद्वारे हप्त्यांच्या होत असलेल्या गोंधळामुळे गैरसमज पसरत चालल्याचे संचालक प्रशांत शिंदे यांनी स्पष्ट केले.उपनिरीक्षक के. के. कांबळे यांनी कर्जाची परतफेड करूनही खात्यामधून बेकायदेशीरपणे पैसे वर्ग केल्याप्रकरणी सोसायटीच्या लिपिक आणि सेक्रेटरीसह अन्य काही जणांविरूद्ध बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार केली होती. कांबळे हे कोंढवा पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. दरम्यान, कांबळे यांनी गैरसमजातून तक्रार दाखल केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कांबळे यांची रक्कम शेअर्स खाती जमा असल्याबाबत आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर नियमानुसार लाभांश अदा करण्यात येणार असल्याचे त्यांना कळविले होते. ईसीएसच्या छापील अर्जावर त्यांचे नाव तसेच हप्त्याची रक्कम देखील छापलेली होती. त्यामुळे त्यांचा किती हप्ता कपात होणार आहे याची कल्पना त्यांना होती. त्यांची रक्कम खात्यावर जमा असल्याबाबतच्या नोंदी त्यांच्या पासबुकमध्ये आहेत. तसेच कपात झालेली रक्कमही एसबीआयच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे. हा सर्व गोंधळ ईसीएसच्या असुविधेमुळे होत आहे. त्यामुळे सभासदांनी गैरसमज मनात ठेवू नयेत असे आवाहन संस्थेने केले आहे.सभासद कर्मचा-यांची वेतनातून नियमितपणे होत असलेली कपात मार्च २०१७ पासून बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे मासिक हप्त्याची रक्कम संस्थेच्या कार्यालयात रोख अथवा धनादेशाद्वारे भरली जात होती. मात्र, काही सभासदांच्या मागणीनुसार व सोईसाठी स्टेट बँकेच्या खात्याचे ईसीएस फॉर्म भरुन घेण्यात आले होते. हे सर्व अर्ज बँकेत जमा करण्यात आले होते. मात्र, बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे काही सभासदांचे ईसीएस अर्ज अद्ययावत करण्याचे राहून गेले.संस्थेचे व्यवहार पारदर्शक आहेत. ईसीएस व्यवहाराची जबाबदारी बँक सभासदांची असून सोसायटीचा यामध्ये काहीही सहभाग नसतो. कर्जाची परतफेड बंद असतानाही सभासदांना गरजेसाठी कर्जपुरवठा सुरु ठेवला आहे. ईसीएस पद्धती नीट न राबविल्याप्रकरणी स्टेट बँकेविरुद्ध दावा दाखल करण्यात येणार आहे. याठिकाणी कोणतेही गैरप्रकार होत नाहीत. सभासदांच्या विश्वासावरच गेली ९८ वर्ष सोसायटी टिकून आहे.- प्रशांत शिंदे, संचालकसोसायटीने त्यांची चूक मान्य करुन माझे कपात झालेले पैसे परत केले. मात्र, त्यानंतरही दोन महिने कपात सुरुच होती. त्यांना याची कल्पना दिल्यावर पुन्हा त्यांनी रक्कम जमा केली. हा प्रकार ईसीएस सिस्टीमच्या अडचणीमुळे होत असल्याचे सांगण्यात आले होते. पैसे परत मिळाल्याने मी हे प्रकरण फार ताणले नाही. पोलीस सोसायटी पोलिसांसाठी असल्याने त्यांचे नुकसान नको म्हणून पुढील कारवाई केली नाही. मात्र, माझ्या पासबुकवर कपात केल्याच्या सर्व नोंदी आहेत. माझी तक्रार गैरसमजातून नव्हती.- के. के. कांबळे, उपनिरीक्षक
ईसीएस सिस्टीमच्या बिघाडामुळे कर्ज हप्त्यांची दुबार कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 5:16 AM