पौड - मुळशी प्रादेशिक योजनेच्या पाण्याचा लाभ घेणाºया काही ग्रामपंचायतींनी सुरुवातीपासून आतापर्यंत, तर काही ग्रामपंचायतींनी काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या सर्व ग्रामपंचातींचा मुळशी प्रादेशिककडून १ जानेवारीपासून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यासंबंधीची लेखी सूचना तत्पूर्वी मुळशी प्राधिकरण कार्यालयाकडून संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आली होती. थकबाकी जमा न झाल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.मुळशी प्रादेशिककडून पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर पिरंगुट, पौड या ठिकाणच्या ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पिरंगुट, पौड, कासार आंबोली या ठिकाणी घरांच्या चाळी बांधून त्या भाड्याने देण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळे या ठिकाणी या गावांमध्ये हजारो भाडेकरू वास्तव्यास आहेत.विशेषत:, पिरंगुट हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव असल्याने तेथे बहुतांश मंडळी भाडेकरू म्हणून राहतात. ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा काही कारणाने बंद झाला, तर घरमालकाकडून पर्यायी पाण्याची व्यवस्था होत नसल्याने अनेकांना खासगी टँकर किंवा बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. काही ठिकाणी तर ५ ते १० रुपयांना पाण्याचा एक हंडा विकत घ्यावा लागत आहे.मुळशी तालुक्यात सर्वाधिक ४५ लाख रुपयांची थकबाकी असणारी ग्रामपंचायत म्हणून पौडचा पहिला क्रमांक, तर २७ लाख रुपये थकबाकी असणारी पिरंगुट ही दुसºया क्रमांकाची थकबाकीदार ग्रामपंचायत ठरली आहे. काही ग्रामपंचायती नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करतात; पण ते पैसे थकबाकी भरण्यासाठी न वापरता अन्य कामांसाठी वापरतात.आतापर्यंत एकूण २० ग्रामपंचायतींची मिळून सुमारे १ कोटी ३१ लाख रुपये थकबाकी असून, त्यातील काही ग्रामपंचायतींनी थकबाकी जमा करण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी खूपच वाढली असल्याने हा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती शाखा अभियंता विश्वनाथ फुलारी यांनी दिली. नागरिकांनी आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत भरून सहकार्य करावे. ग्रामपंचयातींनी जमा झालेल्या रकमेतून ताबडतोब थकीत पाणीपट्टी मुळशी प्राधिकरणाकडे भरावी; अन्यथा ही थकबाकी अशीच वाढत गेल्यास कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेली ही पाणी योजना कायमची बंद पडण्याची वेळ येऊ शकते.त्यामुळे नागरिक व ग्रामपंचायतींनी सहकार्य करण्याचे आवाहन मुळशी प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
मुळशी प्रादेशिककडून २० गावांचे पाणी बंद, थकबाकीमुळे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:25 AM