लोणी काळभोर : खडकवासला धरणसाखळीत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात मुळा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यांत येत आहे. यामुळे मुळा-मुठा नदी या पावसाळ्यात प्रथमच दूथडी भरून वाहू लागली आहे. पाऊस असाच पडत राहिला तर या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीतीरावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.
खडकवासला १०० टक्के भरल्याने धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली. गुरूवारी दुपारी २४०० तर रात्री २५ हजार ३६ क्युसेकने तर शुक्रवारी दुपारनंतर १६ हजार २४७ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. यामुळे मुळा-मुठा नदी जलपर्णीसह सर्व घाण व कचरा दूर सारून दुथडी भरून वहात आहे. नदीचे हे रौद्र परंतू नयनरम्य रूप पाहण्यासाठी नदीलगतच्या गावांतील नागरिक नदीतीरावर गर्दी करत आहेत.
पाण्याचा विसर्गात वाढ करण्यात येत असल्याची माहिती पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष, व नदीलगत असलेल्या सर्व ग्रामपंचायतींन देण्यात आली आहे. सध्या या विसर्गामुळे धोका नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून हवेली तालुका तहसील प्रशासनाने योग्य दखल घेत ग्रामपंचायत, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन व स्थानिक नागरिक यांना आवश्यक त्या सर्व सूचना करत सतर्क राहण्यास सांगितले आहे. हवेलीचे तहसिलदार यांनी मंडल अधिकारी, तलाठी यांना पूरपरिस्थितीची पाहणी करून मुंढवा, केशवनगर, मांजरी खुर्द व मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, थेऊर, कोरेगांवमुळ, भवरापूर, अष्टापूर, व इतर नदीकाठच्या गावच्या पूरपरिस्थितीची पाहणी करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
पाण्याच्या विसर्गामुळे लोणी काळभोर, राजबाग येथील विश्वराज बंधा-यावरून पाणी वहात होते.
कोट
खडकवासला धरण पुर्णपणे भरत आल्याने व धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नदीपात्रात सोडलेल्या विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. अतिवृष्टीमुळे हवेली तालुक्यातील सर्व मंडलाधिकारी व तलाठी यांना स्थानिक ठिकाणी थांबावयास सांगितले आहे. त्याचप्रमाणे नदिकाठच्या परिसराची पाहणी करण्यास सांगितली आहे. पाणी पातळी वाढल्यास व गरज भासल्यास नदिकाठच्या लोकांना स्थलांतरित करण्याच्या सुचनाही दिलेल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनचे पथक तैनात असून संपूर्ण परिस्थितीतीचा आढावा महसूल विभाग घेत आहे. नागरिकांनी नदीपात्रात कोणीही जाऊ नये, गाड्या पार्किंग करु नये.
-सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी हवेली, उपविभाग पुणे
कोट
हवेलीतील मंडलाधिकारी व तलाठ्यांना योग्य त्या सुचना दिलेल्या आहेत. शेतक-यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होत असल्यास प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करुन आवश्यकतेनुसार पंचनामे करण्यास सांगितले आहे. पुणे शहरातील काही गृहनिर्माण सोसायट्या व काही भागात पाणी घुसल्याने पुणे महानगरपालिकेशी संपर्क साधला असून शासकीय शाळा व विविध मंगल कार्यालये बाधित नागरिकांसाठी राखीव ठेवण्याची तजवीज केलेली आहे.
- तृप्ती कोलते पाटील, तहसिलदार, हवेली
फोटो - खडकवासला धरणांतून मुळा - मुठा नदीत पाण्याचा विसर्ग होत असल्याने लोणी काळभोर, राजबाग येथील विश्वराज बंधा-यावरून पाणी वहात आहे.