लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे गेल्या चार महिन्यांत राज्यातील दस्त नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात तर गत वर्षी पेक्षा अधिक दस्त नोंदणी झाली आहे. शासनाच्या या सवलतीमुळे कोरोना काळात कार्यालये बंद असतानाची तुट देखील भरून काढली आहे. मुद्रांक शुल्कात देण्यात आलेल्या तीन टक्क्यांच्या सवलतीला मुदत वाढ देण्याची मागणी बांधकाम क्षेत्रातून होत आहे. शासनाने मुदत वाढ दिली नाही तर १ जानेवारीपासून मुद्रांक शुल्क एक टक्क्याने वाढणार आहे.
बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि त्यात आलेले कोरोनाचे संकट यामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देणे व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ऑगस्ट महिन्यात मुद्रांक शुल्कात दोन टप्प्यांत सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत तीन टक्के , तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत दोन टक्के मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे महसुलात विशेष वाढ झालेली नाही. गेल्या वर्षभरात २८ हजार ९८९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. यंदा आतापर्यंत साडेअकरा हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तसेच १ एप्रिल ते १७ डिसेंबर या कालावधीत राज्यात १५ लाख २२ हजार ५७०, तर के वळ पुण्यात एक लाख ९९ हजार ६८९ दस्त नोंदणी झाली. याच कालावधीत राज्यात ७३९९.४१ कोटी, तर के वळ पुण्यात १४५७.२३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
--
नागरिकांनी मार्च २०२१ पर्यंतच्या सवलतीचा लाभ घ्यावा
शासनाच्या मुद्रांक शुल्कात कपातीच्या निर्णयामुळे दस्त नोंदणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मालमत्ता खरेदी-विक्रीला चालना मिळण्याचा हेतू सफल झाला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील दस्त नोंदणीत सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. मार्च २०२१ पर्यंत असलेल्या सवलतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
- ओमप्रकाश देशमुख, नोंदणी महानिरीक्षक
---
राज्यात सन २०२० मध्ये झालेली दस्त नोंदणी
महिना दस्त नोंदणी
जानेवारी २,९२,३५४
फे ब्रुवारी २,६९,५०८
मार्च २,१४,१९५
एप्रिल ११३९
मे ४२,५७३ ,
जून १,५३,१५५
जुलै १,६५,१३९
ऑगस्ट १,८३,५१५
सप्टेंबर २,४७,६०९
ऑक्टोबर २,७४,२३५
नोव्हेंबर २७४७७३
डिसेंबर ४,००,०००