पुणे : सततच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे पुण्यातील पर्वती दर्शन येथील महिलांनी शिवदर्शन येथील चाैकात पाण्याचे हंडेे घेऊन येत रास्ताराेकाे केले. आज सकाळी हे आंदाेलन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदाेलन मागे घेतले. दरम्यान या आंदाेलनामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली हाेती.
दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी शहरात पाणी बंद ठेवण्यात आले हाेते. आज सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु पर्वती दर्शन भागात पाणीच न आल्याने येथील महिलांनी संताप व्यक्त केला. गेल्या अनेक काळापासून या भागात अनियमित पाणीपुरवठा हाेत असल्याने महिलांनी पाण्याचे हांडे घेत रास्ताराेकाे केले. महिला या भागातील शिवदर्शन चाैकामध्ये ठाण मांडून बसल्या. तसेच जाेपर्यंत नियमित पाणीपुरवठा हाेणार नाही ताेपर्यंत आंदाेलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा या महिलांनी घेतला. दरम्यान पाणी पुरवठा सुरुळीत करण्याचे आश्वासन पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानी दिल्यानंतर महिलांनी आंदाेलन मागे घेतले.
यंदाच्या मान्सूनमध्ये शहरात आणि धरणक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल असून खडकवासला धरणातून सातत्याने पाणी साेडण्यात आले. अजूनही पुण्यातील घाट माथ्यावर चांगला पाऊस हाेत असल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणं ओव्हरफ्लाे झाली आहेत. असे असताना पुणेकरांना चाेवीस तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणारी पालिका एक वेळ सुद्धा नियमित पाणी पुरवठा करत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.