लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जागतिक बाजारात क्रुड आॅईलच्या किमतीत जबरदस्त घट झाल्यानंतरही त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळण्याऐवजी केंद्र सरकारने स्वत:कडे घेतला असून भाजपाचे सरकार केंद्रात आल्यानंतर पेट्रोल व डिझेलवरील सेस आणि अतिरिक्त करातून तीन वर्षांत दुप्पट वसुली केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे़ २०१३-१४मध्ये केंद्र सरकारला पेट्रोल व डिझेलवरील सेस आणि अतिरिक्त करातून ५४ हजार ८३७ कोटी रुपये मिळाले होते़ तर, २०१६-१७ मध्ये ही रक्कम तब्बल १ लाख १५ हजार ८०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे़ केंद्र सरकारच्या अर्थ विभागाने ही माहिती दिली आहे़ सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केंद्र सरकारच्या अर्थ खात्याला पेट्रोल व डिझेलच्या विक्रीतून केंद्र सरकारला सेसद्वारे किती महसूल मिळाला़ पेट्रोल व डिझेलच्या विक्रीतून किती उत्पादन शुल्कापोटी महसूल मिळाला आणि इतर करातून किती महसूल मिळाला, याची माहिती माहिती अधिकाराद्वारे मागितली होती़ त्यावर अर्थखात्याने ही माहिती संकेतस्थळावर असल्याचे उत्तर देऊन त्यांचा अर्ज निकाली काढला होता़ पण, संकेतस्थळावर ही माहिती न मिळाल्याने त्यांनी अर्थखात्याच्या उपसचिवांकडे अपील दाखल केले होते़ त्यांनी वेलणकर यांची मागणी मान्य करून तातडीने माहिती पुरविण्याचे आदेश दिले़ दोन वर्षांपूर्वी २०१४-१५मध्ये पेट्रोल व डिझेलवरील सेस आणि अतिरिक्त करापोटी ५४ हजार ९३७ कोटी रुपयांचा महसूल केंद्र सरकारला मिळाला होता़ २०१५-१६ मध्ये १ लाख २ हजार २३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते़ यंदा २०१६-१७ मध्ये १ लाख १५ हजार ८०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे़
इंधनावर दुप्पट करवसुली
By admin | Published: May 15, 2017 6:46 AM