पुणे : दिवाळीच्या सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेरगावी गेले आहेत, त्यात अद्यापही अनेक मेस, खानावळी, कंपन्यांचे कँटिन सुरू झालेले नाहीत. याचा परिणाम बाजारात फळभाज्यांना उठाव कमी आहे. परंतु आताच बाजारावर दुष्काळाचे सावट पसरले असून, सर्वच फळभाज्या, पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. यामुळे दिवाळी सुट्यांमुळे मागणी कमी असून, आवक कमी झाल्याने सर्वच फळभाज्यांचे दर चांगले वाढले आहेत.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी (दि. ११) आवक कमी आणि मागणीदेखील कमी असल्याने घेवडा, मटार, आले, हिरवी मिरची, शेवगा, काकडी, कोबी, सिमला मिरची आणि गाजराच्या दरात सुमारे १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर आवक वाढल्यामुळे बटाटा, भेंडी, टोमॅटो आणि पावट्याच्या दरामध्ये घट झाली आहे. उर्वरित भाज्यांचे भाज्यांचे गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. रविवारी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात सुमारे १४० ते १५० ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यातून आलेल्या भावामध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून दोन ट्रक कोबी, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून १२ ते १३ टेम्पो हिरवी मिरची, बंगळुरूयेथून १ टेम्पो आले, आंध्र प्रदेशआणि तमिळनाडू येथून २ ते ३टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ४ ट्रक गाजर, हिमाचल प्रदेश येथून २ ट्रक मटार, कर्नाटक येथून २ टेम्पो घेवडा, कर्नाटक येथून २ टेम्पो पावटा, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली.स्थानिक भागातून सातारी आले ४०० ते ५०० पोती, टॉमेटो साडेपाच ते सहा हजार पेटी, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ८ ते १० टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, शेवगा २ ते ३ टेम्पो, भुईमूग ४० ते ५० पोती, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, गाजर १५० टेम्पो, पावटा ३ ते ४ टेम्पो, कांद्याची ८० ते १०० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची ४५ ट्रक इतकी आवक झाली.पालेभाज्यांच्या दरात घसरणदिवाळीनिमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे शेतकऱ्यांनी बाजारात माल आणला नाही. शेतात राखलेला माल रविवारी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारात आणला. यामुळे रविवारी (दि. ११) मार्केट यार्ड येथील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक चांगलीच वाढली होती. त्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे शेपू, कोथिंबीर, मेथी, चाकवत, अंबाडी, राजगिरा, मुळे, चवळई आणि पालकच्या दरात घट झाली आहे. मागणी वाढल्यामुळे केवळ कांदापातीचे दर वाढले आहेत. उर्वरित सर्व पालेभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.मार्केट यार्डातील तरकारी विभागात शेपूला मागणी कमी आहे. त्यामुळे घाऊक बाजारात शेपूच्या दरात जुडीमागे तब्बल ५ रुपयांनी घसरले आहेत. शेपूला घाऊक बाजारात जुडीला ५ ते ८ रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात १० ते २० रुपये जुडीने शेपूची विक्री होत आहे. कोथिंबिरीची आवक वाढली आहे. रविवारी (दि. ११) तब्बल दोन लाख जुडी आवक झाली आहे. जी गेल्या आठवड्यात १ लाख २५ हजार जुडी होती. त्यामुळे कोथिंबिरीचे दर घसरले आहेत.